इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात पाच वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ५ सामने खेळले आहेत. यात त्यांना अवघ्या दोन सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.संघातील फलंदाज मोठ्या धावांचा डोंगर उभारण्यात अपयशी ठरत आहेत. तर संघाची गोलंदाजी देखील कमजोर दिसून येत आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळलेल्या वेगवान गोलंदाजाने मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केला आहे.
मुंबई इंडियन्स संघात ट्रेंट बोल्टसह आणखी एका न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाची भर पडली आहे. स्कॉट कुगलइन (Scott Kuggeleijn) याला मुंबई इंडियन्स संघात राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. याची माहिती, जीमी नीशमने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून दिली होती. त्याने स्कॉट कुगलइनचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो बिलियर्ड्स खेळताना दिसून येत होता.
स्कॉट कुगलइन याने २०१९ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला अवघे २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्याला लुंगी एन्गिडीचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात घेण्यात आले होते. त्यानंतर चेन्नईने त्याला रिलीज केले होते.
स्कॉट कुगलइनची कारकीर्द
स्कॉट कुगलइनने आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात सहभाग घेतला होता .त्याची मूळ किंमत ५० लाख इतकी होती. परंतु त्याला कुठल्याही संघाने आपल्या संघात स्थान दिले नव्हते. त्याने आतापर्यंत न्यूझीलंड संघासाठी १६ टी -२० सामने खेळले आहेत. यात त्याला १३ गडी बाद करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ७९ धावा देखील केल्या आहेत. तसेच त्याने २ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याला ५ गडी बाद करण्यात यश आले आहे.
मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत.यात त्यांना अवघे २ सामने जिंकण्यात यश आले आहे. मुंबई इंडियन्स संघ आता दिल्लीमध्ये आहे. त्यांचा पुढील सामना येत्या २९ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार आहे.