आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) सुरुवात झाली. गुरुवारी क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात ५७ धावांनी विजय मिळवत मुंबईने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मुंबईने सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
याआधी मुंबई इंडियन्सने २०१०, २०१३,२०१५, २०१७ आणि २०१९ ला अंतिम सामना खेळला होता. यातील चारवेळा त्यांनी अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे आणि विजेतेपद जिंकले आहे.
गुरुवारी मुंबईने दिल्लीला २०१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने पहिल्या ३ विकेट्स शून्यावरच गमावल्या. त्यानंतरही दिल्लीची आवस्था दयनीयच राहिली. ४१ धावांत दिल्लीने ५ विकेट्स गमावल्या होत्या.तरी या परिस्थितीतही दिल्लीकडून मार्कस स्टॉयनिसने ६५ धावांची अर्धशतकी खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचीत करत मुंबईच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर केला.
स्टॉयनिसबरोबरच दिल्लीकडून अक्षर पटेलने ४२ धावांची झुंजार खेळी केली. मात्र आधीच्या फलंजांनी विकेट गमावल्या असल्याने दिल्लीला शेवटी विजय मिळवणे कठिण गेले. दिल्लीला २० षटकात ८ बाद १४३ धावाच करता आल्या.
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने २ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद २०० धावा केल्या होत्या. सुर्यकुमारने ३८ चेंडूत ५१ धावा आणि इशानने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. तसेच मुंबईकडून क्विंटन डी कॉकने २५ चेंडूत ४० आणि हार्दिक पंड्याने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.
दिल्लीकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर एन्रीच नॉर्किए आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
याला ‘मुंबई इंडियन्स’ ऐसे नाव, वाईट वेळ आलेली असतानाही…
मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच नडली, पण ‘ही’ दोन ठिकाणं कर्णधार रोहितलाच नडली
IPL – मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये दाखल; दिल्लीविरुद्ध मिळवला दणदणीत विजय





