---Advertisement---

ब्रेकिंग! ‘मुंबई नाही तर कोणासाठीच नाही’, कायरन पोलार्डची आयपीएलमधून निवृत्ती

On: मंगळवार, नोव्हेंबर 15, 2022 2:08 PM
Kieron-Pollard
---Advertisement---

आयपीएल 2023 साठी सर्व संघांना आगामी हंगामासाठी कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यायची आहे.‌ या आयपीएल रिटेन्शनबाबत सध्या अनेक बातम्या समोर येत असताना एक मोठी बातमी पुढे येत आहे. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज अष्टपैलू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने ही माहिती ट्विट करत चाहत्यांना दिली.

आयपीएलमध्ये 100 पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या काही मोजक्याच खेळाडूंपैकी एक असलेल्या कायरन पोलार्ड याने 2010मध्ये आयपीएल पदार्पण केले. त्याच्यानंतर तब्बल 13 वर्षानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्याशी संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे निराश होत त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याने ट्विट करत एक भलेमोठे पत्र चाहत्यांसाठी लिहिले असून त्यातील काही ठळक मुद्दे जाणून घेऊ.

या ट्विटमध्ये पोलार्डने लिहिले, ‘मी मुंबईशिवाय दुसऱ्या कोणत्याच संघाकडून खेळू इच्छित नाही. हा भावनिक निरोप नसून मी मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक होण्याचे स्विकारले आहे. या लीगमध्ये मी जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळलो. चाहत्यांनीही भरभरून प्रेम दिले. मुंबई इंडियन्ससोबत मी 2011 आणि 2013मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकलो. तसेच 2013, 2017, 2019 आणि 2020मध्ये आयपीएलचे विजतेपद जिंकले.’

या ट्विटमध्ये त्याने प्रशिक्षक, कोचिंग स्टाफ आणि अंबानी कुटुंबाचे आभार देखील मानले.

 

पोलार्डने 2010 च्या आयपीएल हंगामातून पदार्पण केले. पदार्पणाचा सामना तो दिल्लीविरुद्ध अरूण जेठली स्टेडियमवर खेळला होता. त्यामध्ये त्याने 10 धावा करताना एक विकेटही घेतली होती. हा सामना मुंबईने 98 धावांनी जिंकला होता. आयपीएलच्या कारकिर्दीतील त्याच्या शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ठरला. डी व्हाय पाटील स्टेडियम, मुंबई येथे खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात त्याची निराशाजनक कामगिरी झाली. त्याने 2 षटके टाकताना 26 धावा दिल्या, तर फलंदाजी करताना केवळ 16 चेंडूत 15 धावा केल्या. तो सामना मुंबईने 52 धावांनी गमावला.

पोलार्डच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट जरी निराशाजनक राहिला असला तरी त्याने अनेक सामनाविजयी खेळी केल्या. त्यातील काही विशिष्ट खेळी आपण पाहू. त्याने 2010च्या अंतिम सामन्यात 10 चेंडूत 27 धावा, 2013च्या अंतिम सामन्यात 32 चेंडूत नाबाद 60 धावा, 2015च्या आयपीएल अंतिम सामन्यात 18 चेंडूत 36 धावा आणि 2019च्या अंतिम सामन्यात 25 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या होत्या.

पोलार्डने आयपीएलमध्ये 189 सामने खेळताना 3412 धावा केल्या असून त्यामध्ये 16 अर्धशतके, 218 चौकार आणि 223 षटकारांचा समावेश आहे. तसेच त्याने 69 विकेट्सही घेतल्या. Kieron Pollard Retire From IPL

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक करतोय एन्जॉय! शर्टलेस फोटो झाले व्हायरल
IPL 2023: केकेआरला दुसरा झटका, बिलिंग्जनंतर कर्णधारानेही ट्विट करत पुढच्या हंगामात खेळण्यास दिला नकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---