---Advertisement---

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर ऐतिहासिक विजय! केकेआरला 6 विकेट्सने धूळ चारत संपवला 13 वर्षांचा विजयाचा दुष्काळ

On: रविवार, मार्च 29, 2026 11:30 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) दुसऱ्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 6 गडी राखून पराभव करत इतिहास रचला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत 220 धावांचे डोंगर उभे केले होते. हे आव्हान मुंबईसाठी कठीण वाटत होते, पण रोहित शर्मा (Rohit Sharma & Ryaan Rickelton) आणि रयान रिकेल्टन यांच्या मनात काहीतरी वेगळेच होते. या दोघांनीही झंझावाती फलंदाजी करत केकेआरच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. मुंबई इंडियन्ससाठी हा विजय खास आहे, कारण आयपीएलच्या इतिहासात त्यांनी पहिल्यांदाच 220 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. तसेच, 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईने हंगामातील आपला पहिलाच सामना जिंकला आहे.

रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 71 चेंडूत 148 धावांची जबरदस्त भागीदारी झाली. ‘हिटमॅन’ रोहितने 38 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर 78 धावा केल्या, त्यानंतर तो वैभव अरोराच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवने 8 चेंडूत 16 धावा केल्या. अखेरच्या षटकात मुंबईने 4 गडी गमावून 221 धावांचे लक्ष्य गाठले. कर्णधार हार्दिक पंड्या 18 धावांवर तर नमन धीर 5 धावांवर नाबाद राहिले.

तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केकेआरने धडाकेबाज सुरुवात करत पॉवरप्लेमध्येच 78 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने 40 चेंडूत 67 धावांची खेळी केली. मात्र, मधल्या षटकांत ठराविक अंतराने विकेट्स पडल्यामुळे मुंबईने सामन्यात पुनरागमन केले. शेवटच्या षटकांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज अंगकृष रघुवंशीने 29 चेंडूत 51 धावा फटकावल्यामुळे केकेआरला 220 धावांपर्यंत पोहोचता आले. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पंड्याला एक विकेट मिळाली. जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 35 धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---