भारतात सध्या गणशोत्सवाची धामधूम सुरु आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. असाच उत्साह सध्या मुंबई इंडियन्स संघातही दिसून येत आहे. नुकताच मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात खेळाडू मोदक खाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मोदकांशिवाय गणेशोत्सवाची कल्पनाही करता येत नाही. बुद्धीचा देवता असलेल्या गणेशाला सर्वात प्रिय असलेला मोदक या सणात सर्वात महत्त्वाचा आहे. तो जसा गणपतीला आवडतो, तसाच तो सर्वांनाच आवडतो. त्यामुळे अनेकजण कधी गणपती बाप्पाची स्थापना होते आणि मोदक खायला मिळतो, याचीच वाट पाहात असतात. अशाच प्रकारे मुंबईचे खेळाडू मोदक खाण्यासाठी उत्सुक असलेला एक व्हिडिओ इंस्टाग्रावर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की अर्जून तेंडुलकर, धवल कुलकर्णी आणि आदित्य तरे मोदक खाण्यासाठी आतुर आहेत. त्यांच्यासमोर मोदकांनी भरलेले ताट आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘माझा बाप्पा किती गोड दिसतो’, हे प्रसिद्ध मराठी गाणं वाजत आहे. या व्हिडिओला मुंबई इंडियन्सने कॅप्शन दिले आहे की ‘पलटन, किती मोदक खाल्ले आत्ता पर्यंत?’ या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. अनेकांनी विविध कमेंटही केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CTtkieMjquf/
सध्या मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबुधाबीमध्ये आहे. तसेच अबुधाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू सध्या सराव करत आहेत. अनेक खेळाडू मागील महिन्यात युएईला पोहचले होते. तर, नुकतेच इंग्लंडच्या दौऱ्यावरुन कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह संघात सामील झाले आहेत. त्यांना ६ दिवसांसाठी क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्यानंतर ते संघाशी जोडले जातील.
आयपीएल २०२१ ला एप्रिलमध्ये भारतात सुरुवात झाली होती. मात्र, कोरोनाची प्रकरणे आढळल्याने हा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आता हा उर्वरित हंगाम दुसऱ्या टप्प्यात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होईल. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरू होण्याआधीच सीएसकेला मोठा धक्का, प्रमुख फलंदाज झाला दुखापतग्रस्त
बुमराह फलंदाजांच्या विचारांशी खेळतो, म्हणून तो यशस्वी गोलंदाज, भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसूमने
Video: इंग्लड दौरा गाजवल्यानंतर सीएसकेचे शार्दूल, जडेजा, पुजारा पोहचले दुबईत, आता राहणार क्वारंटाईन