---Advertisement---

अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सची आकडेवारी धक्कादायक, जीटीचा विजयीरथ रोखत एमआयचा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न

On: सोमवार, एप्रिल 20, 2026 10:25 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ चा हंगाम पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्ससाठी काहीसा निराशाजनक ठरत आहे. मुंबईने खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये केवळ एकच विजय मिळवला आहे. आज (२० एप्रिल) त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गुणतालिकेत सर्वात शेवटी असणाऱ्या मुंबईला आणखी एक पराभव अडचणीचा ठरेल. त्यामुळे आजचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे, मात्र अहमदाबादच्या मैदानावरील त्यांची आकडेवारी पाहिली तर धक्का बसेल.

गुजरातने मुंबईविरुद्ध अहमदाबादमध्ये नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. सध्या मुंबईचे गोलंदाज संघर्ष करताना दिसत आहे, यामुळे त्यांना गुजरात चांगलेच आव्हान देण्याची शक्यता आहे. मुंबईचे दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्ट नव्या चेंडूने विकेट घेण्यात अपयशी ठरत आहे, उलट ते अधिक धावा देत आहेत. तसेच जसप्रीत बुमराह पण लयीत दिसत नाही.

सध्याच्या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स शार्दुल ठाकुरने घेतल्या आहेत. त्याने ६ विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट चिंताजनक आहे. त्याने तब्बल १३.५७ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. दुसरीकडे त्यांचे फिरकीपटू उत्तम कामगिरी करत सामन्यावर काहीसे नियंत्रण ठेवत आहेत. मिचेल सॅंटनर प्रभावी ठरत आहे, मात्र अल्लाह गझनफरने विकेट्स घेतल्या असल्या तरी धावा दिल्या आहेत.

गुजरात आणि मुंबई संघात अहमदाबादमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले गेले. ते चारही सामने गुजरातने जिंकले आहेत. त्यामध्ये २०२३ च्या हंगामातील दोन सामने, २०२४ आणि २०२५ मधील प्रत्येकी एक सामना यांचा समावेश आहे.
मुंबईच्या गोलंदाजीबरोबर फलंदाजी या हंगामात चिंतेचा विषय बनली आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असून तो आजच्या सामन्यात खेळणार की नाही, हे निश्चित नाही. त्याच्याजागी आलेल्या क्विंटन डी कॉकने पंजाब किंग्जविरुद्धच्या मागील सामन्यात शतकी खेळी करत संघाची डोकेदुखी काहीशी कमी केली आहे, मात्र अखेरच्या षटकांमध्ये मुंबईच्या धावांचा वेग कमी होताना दिसत आहे.

दुसरीकडे गुजरातची गोलंदाजी आणि फलंदाजी उत्तम ठरत आहे. मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडा नव्या चेंडूने उत्तम सुरूवात करत आहेत. तसेच प्रसिद्ध कृष्णा आणि अशोक शर्मा हे ही त्यांना योग्य साथ देत आहेत. स्पिनर राशिद खान मधल्या षटकांमध्ये दबाब निर्माण करत आहे. त्यांची फलंदाजीही सुरेख होत असून कर्णधार शुबमन गिलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळवला असता तरी त्यांनी सामना लवकर संपवायला आवडते, असे म्हटले होते.

या हंगामात गुजरातने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्यांनी हे तिन्ही विजय सलग मिळवले असून मुंबईने मात्र सलग चार सामने गमावले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघामध्ये आतापर्यंत एकूण ८ सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये ५ विजयांसह गुजरात आघाडीवर असून मुंबईने ३ सामने जिंकले आहेत.

हार्दिक पांड्याने २०२२ मध्ये ज्या मैदानावर गुजरातला पहिले आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले, आता त्याच मैदानावर तो पुनरागमन करत असून सामन्याची उत्सुकता अधिक वाढली आहे. या सामन्यात मुंबई त्यांच्या या मैदानावरील पराभवाची मालिका खंडीत करणार की पुन्हा एकदा गुजरात बाजी मारणार हे, पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---