मुंबई इंडियन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 13 वर्षांच्या आयपीएल इतिहासात 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. यात महत्त्वाची भूमिका आहे संघाचा यशस्वी कर्णधार रोहित शर्माची. रोहित शर्मा 2011 पासून मुंबईच्या संघात समाविष्ट झाला आहे. त्या अगोदर त्याने आयपीएल विजेता संघ डेक्कन चार्जर्सकडून 3 वर्षे खेळ केला होता. 2011 साली संघात आल्या पासूनच मुंबईचा संघ मोठा संघ बनू लागला. पुढे 2013 पासून रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार बनला. मुंबईने आतापर्यंत गेल्या 10 वर्षात 5 आयपीएल स्पर्धा व 2 चॅम्पियन्स लीग अशा एकूण 7 स्पर्धा जिंकल्या आहेत.
मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड – पहा मागील 10 वर्षांत कश्या जिंकल्या 7 टी-20 स्पर्धा
2011 – चॅम्पियन्स लीग टी-20
भारताने 2008 साला पासूनच आयपीएलसमवेत या स्पर्धेचे आयोजन केले होते. जगभरातील टी20 लीग किंवा देशांतर्गत टी20 क्रिकेट खेळणाऱ्या चॅम्पियन संघांना या स्पर्धेत आपसात खेळवण्यात येत होते. या स्पर्धेत 2011 साली अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करीत मुंबईने ही स्पर्धा जिंकून प्रथमच कुठली तरी टी-20 लीग जिंकण्याचा मान मिळवला होता.
2013 – पहिले आयपीएल विजेतेपद
मुंबई इंडियन्स संघाला एक नवा कर्णधार सन 2013 ला मिळाला होता आणि तो म्हणजे आयपीएलचा आजचा एक यशस्वी कर्णधार रोहित शर्मा. त्यावेळी कोणत्याही अपेक्षा नसताना रोहितने सर्वांना अचंबित केले आणि पहिल्यांदाच मुंबईला आयपीएल विजेतेपद पटकावून दिले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला एकतर्फी पराभूत करून मुंबईने पहिली आयपीएल ट्रॉफी उचलली.
2013 – चॅम्पियन्स लीग टी-20
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएल स्पर्धा जिंकून चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने 2013 ला जबरदस्त खेळ केला. दिल्लीच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून दुसऱ्यांदा ही स्पर्धा आपल्या नावावर केली.
2015 – आयपीएलचे दुसरे विजेतेपद
मुंबईच्या संघाने 2015 च्या हंगामातही जबरदस्त खेळ केला होता. रोहित शर्माने दुसऱ्यांदा त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. या सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्स संघाचा एकतर्फी पराभवकरून आयपीएल जेतेपद पटकावले.
2017 – आयपीएलचे तिसरे विजेतेपद
मुंबईचा संघ 2017 च्याही स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत होता. मात्र असे असले तरी स्टिव्ह स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायन्ट्स संघासमोर मुंबईचा संघ टिकू शकत नव्हता. ग्रुप स्टेज आणि क्वालिफायर 1 गमावल्यानंतरही अंतिम सामन्यात मुंबईला याच संघाचा पराभव करावा लागणार होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने अतिशय छोटे आव्हान पुण्याला दिले. सुरुवाती पासूनच सांभाळून खेळणाऱ्या पुण्याने शेवटी शेवटी विकेट्स गमावल्या आणि शेवटच्या चेंडूवर मुंबईने मात्र एका धावेने हा सामना जिंकून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावली.
2019 – आयपीएलचे चौथे विजेतेपद
सन 2018 ला मुंबईचा संघ ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करू शकला नव्हता. पण 2019 हंगामासाठी मुंबईने लिलावातून काही महत्त्वाचे खेळाडू उचलले होते. क्विंटन डी कॉक हा त्यातीलच एक. डी कॉक संघाला चांगली सुरुवात करून देत राहिला आणि रोहित शर्माला एक चांगला जोडीदार मिळाला. या हंगामात मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी कायम राहिला. शिवाय अंतिम सामन्यात खेळायला आलेल्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला मुंबईने चार पैकी चार सामन्यांत धूळ चारली होती. पुनरागमन केलेल्या मलिंगाने यॉर्कर फेकून मुंबईला एका धावेने अंतिम सामन्यात विजयी केले आणि मुंबईने चौथ्या वेळेस आयपीएल किताब जिंकला.
2020 – आयपीएलचे पाचवे विजेतेपद
गतवर्षीप्रमाणेच 2020 वर्षी मुंबईने अव्वल दर्जाचा खेळ केला. मलिंगाच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्टने मुंबईला वजनदार खेळ करून दाखवला. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरोधात अर्धशतकी खेळी साकारत रोहितने आणखी एक चषक आपल्या नावावर करून घेतला. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक 5 आयपीएल किताब जिंकणारा संघ बनला.
महत्त्वाच्या बातम्या –
जब जब हम खेलेंगे तब तब जितेंगे! रोहित शर्मासाठी आयपीएलची फायनल नेहमीच ठरलीय लकी
मुंबई इंडियन्सच्या पाचही आयपीएल विजेत्या संघात रोहित व्यतिरिक्त केवळ ‘हा’ खेळाडू होता सहभागी
संपुर्ण यादी- आयपीएल २०२०मध्ये या खेळाडूंना मिळाले अवॉर्ड्स!