भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल आगामी लंका प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. तो एकेवेळचा संघसहकारी इरफान पठाण सोबत कँडी टस्कर्स या संघाची जर्सी परिधान करेल. श्रीलंका क्रिकेट बोर्ड येत्या २६ नोव्हेंबरपासून लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचे आयोजन करणार आहे.
लंका प्रीमियर लीगने ट्विटरच्या माध्यमातून मुनाफला संघात घेतल्याची घोषणा केली आहे. “भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याने कँडी टस्कर्स बरोबर करार केला आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुनाफ जरी लंका प्रिमियर लीगमध्ये सामील झाला असला तरीही दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराझ अहमदने या स्पर्धेतून माघार घेतल्याच्या बातम्या येत आहेत.
गॉल ग्लॅडिएटर्स फ्रँचायझीचा कर्णधार असणारा सरफराज आता या स्पर्धेत भाग घेणार नाही. कारण तो राष्ट्रीय संघासह
न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.
गॉल फ्रँचायझीचे प्रशिक्षक मोईन खान म्हणाले की, “न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तानच्या संघात सरफराजची निवड झाली आहे. त्यामुळे तो श्रीलंकेत येणार नाही. आता आम्हाला नवीन कर्णधार निवडावा लागेल. आम्ही संघ मालक आणि व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ.”
भारताकडून १३ कसोटी, ७० एकदिवसीय आणि तीन टी -२० सामने खेळणारा ३७ वर्षीय पटेल २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. २०११ साली तो भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून शेवटचा व्यावसायिक सामना २०१७मध्ये खेळला आहे. सध्या त्याचे वय ३७ वर्ष आहे.






