भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 2011 हे वर्ष सुवर्ण अक्षरांनी नोंदले गेलेले आहे. यावर्षी भारताने एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. दरम्यान विराट कोहली बाद झाला तेव्हा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले होते. धोनी स्वतः युवराजऐवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. धोनीने आपला हा निर्णय योग्य सिद्धही केला होता. त्याने नाबाद 91 धावांची विजयी खेळी खेळून अविस्मरणीय षटकार देखील खेचला आणि विश्वचषक भारताच्या पारड्यात टाकला होता. यावर आता श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथैया मुरलीधरन याने धोनीच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
धोनीने युवराजऐवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय आपल्यामुळेच घेतला असल्याचे मुरलीधरनचे म्हणणे आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलतांना हा दिग्गज फिरकीपटू म्हणाला, ‘धोनीने चेन्नईमध्ये माझी गोलंदाजी अभ्यासली होती. मला आठवते की युवराजला विश्वचषकात माझ्या गोलंदाजी शैलीबद्दल काहीच कल्पना नव्हती. तरीही त्याला फलंदाजीला यायचे होते. पण मला वाटते की, माझ्यामुळे धोनी युवराजच्या आधी मैदानावर आला. मी धोनीसोबत चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळलो असल्याने धोनी माझे चेंडू सहज खेळू शकत होता.’
आपल्या दुसऱ्या (गोलंदाजीचा एक प्रकार) बद्दल मुरली म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरला माझ्या दुसऱ्याबद्दल चांगलीच माहिती असावी. पण मला वाटले की राहुल द्रविडला यात अडचणी आल्या होत्या. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीरनेही दुसरा नीट खेळून काढला होता. वीरेंद्र सेहवागचे मला माहित नाही.’
विश्वचषक २०११ मध्ये भारतीय कर्णधार एमएस धोनी धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता. अंतिम सामन्यापूर्वी विश्वचषकात त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 34 धावांची होती. परंतु अंतिम सामन्यात त्याने नाबाद 91 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती.
श्रीलंकेच्या 275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. दुसऱ्याच चेंडूवर सेहवाग शून्यावर बाद झाला होता. यानंतर काही चांगले फटके खेळल्यानंतर सचिन तेंडुलकर देखील मलिंगाचा बळी ठरला होता. कोहलीसह गंभीरने संघाची धावसंख्या 114 धावांवर नेली होती. कोहली आणि गंभीरने संघाला सुस्थितीत आणून ठेवले होते. यानंतर धोनीने युवराजसह भारताला 6 गडी राखून अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
हे पोरगं गजब आहे! पंतचे चक्क इंग्लंडकडून यष्टीरक्षण; समालोचक म्हणे, ‘उभ्या आयुष्यात असं पाहिलं नाही’
‘कर्णधार कोहलीच्या आदेशानंतरच बुमराहने इंग्लंडच्या खेळाडूला जखमी करण्याचा प्रयत्न केला’
हे पाहा…! मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती, मांडला व्हॉलीबॉलचा डाव