बांग्लादेश क्रिकेट संघाच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची भर पडली आहे. बांग्लादेश संघाला कसोटी क्रिकेटमध्ये विशेष स्थान मिळवणारा पहिला फलंदाज मिळाला आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून संघाचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीम आहे. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण करून नवा विक्रम रचला आहे.
बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांग्लादेशचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या 106 धावांत गडगडला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 308 धावा केल्या. बांग्लादेशने दुसऱ्या डावात चांगले पुनरागमन केले आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 3 गडी गमावून 101 धावा केल्या होत्या. महमुदुल हसन जॉय 38 धावा करून नाबाद तर मुशफिकर रहीम 31 धावा करून नाबाद माघारी परतला.
दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी मुशफिकुर रहीमने केशव महाराजच्या चेंडूवर चौकार मारल्याने त्याने 6000 कसोटी धावा पूर्ण करून नवा इतिहास रचला. रहिम हा बांग्लादेशकडून कसोटीत 6000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी बांग्लादेशसाठी कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आली नव्हती.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे बांग्लादेशी फलंदाज
मुशफिकुर रहीम- 6003
तमीम इक्बाल- 5134
शाकिब अल हसन- 4609
हबीबुल बशर- 3026
महमुदुल्लाह- 2914
मुशफिकर रहीमने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 93 कसोटी सामन्यांच्या 72 डावांमध्ये 38.48 च्या सरासरीने 6003 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 11 शतके आणि 27 अर्धशतके केली आहेत. ज्यात नाबाद 219 धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. 2005 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा मुशफिकुर बांग्लादेशच्या सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, 6 हजार कसोटी धावांचा आकडा गाठण्यासाठी त्याला 19 वर्षांचा कालावधी लागला.
बांग्लादेशने पहिला कसोटी सामना नोव्हेंबर 2000 मध्ये खेळला होता. त्यानंतर 24 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. या कालावधीत संघातील केवळ एका फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे.
हेही वाचा:
IND VS AUS; BGT मालिकेसाठी या अष्टपैलू खेळाडूला मिळणार स्थान
संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू पुढील सामन्यातून बाहेर!
वाईट प्रदर्शनानंतरही सिराजला पुणे कसोटीत मिळणार संधी? सहाय्यक प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य