30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. त्यानेही या जबाबदारीचे भान असल्याचे सांगितले आहे. तसेच भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला मदत करणे ही जबाबदारी आहे, असेही म्हटले आहे.
इंडिया टूडेशी बोलताना रोहित म्हणाला, ‘संघाचा उपकर्णधार म्हणून विराट बरोबर उभे राहण्याची आणि तो संभ्रमात असताना त्याला मदत करण्याची माझी जबाबदारी आहे. आम्ही मागील काही वर्षांपासून असे करत आहोत.’
रोहित हा 2007 पासून भारतीय संघात आहे. तसेच रोहित आता संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याने एमएस धोनीला जसा सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवागने पाठिंबा दिला त्याप्रमाणे विराटला पाठिंबा देण्याची त्याची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
12 वर्षांपासून भारतीय संघाकडून खेळत असलेला रोहित म्हणाला, ‘जेव्हा धोनी कर्णधार होता, तेव्हा सेहवाग, सचिन आणि संघातील अन्य वरिष्ठ खेळाडू हे त्याला मदत करायचे आणि गरज असेल तेव्हा सल्ले द्यायचे. आता आम्ही संघात अनेक वर्षांपासून खेळत असल्याने कर्णधाराला मदत करण्याची आमची जबाबदारी आहे.’
त्याचबरोबर संघातील वातावरणाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, ‘संघ हा एका खेळाडूमुळे बनत नाही. संघ हा खेळत असलेल्या 15 खेळाडूंनी बनतो. त्यामुळे संघातील कोणत्याही खेळाडूने येऊन कोणतेही सल्ले दिले तरी संघासाठी चांगलेच आहे.’
याआधीही विराटने म्हटले होते की तो रोहित आणि धोनी यांच्याकडून सल्ले घेत असतो.
2019 विश्वचषकाला इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरुवात होणार आहे. या विश्वचषकातील भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिके विरुद्ध होणार आहे. सध्या भारतीय खेळाडू हे आयपीएलमध्ये व्यस्त असून आयपीएलनंतर ते विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
–गे नसल्याचे जेम्स फॉकनरने केले स्पष्ट; त्या फोटोमागील सत्याचाही केला खूलासा
–डेव्हिड वॉर्नरचा आयपीएल २०१९ला भावनिक अलविदा…
–आयपीएल २०१९: रिषभ पंतने संगकाराला मागे टाकत केला मोठा कारनामा