जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा चौदावा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करावा लागला होता. अचानकपणे खेळाडू व प्रशिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या दोन खेळाडूंपैकी एक संदीप वॉरियरने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
प्रथम पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूंपैकी एक आहे संदीप
आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयने खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बायो-बबल तयार केलेला. यामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीस येण्यास परवानगी नव्हती. अशा परिस्थितीतही कोलकाता नाईट रायडर्सचे वरूण चक्रवर्ती व संदीप वॉरियर हे दोन खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यानंतर आणखी खेळाडू व काही प्रशिक्षक यांना देखील करोना झाल्याचे निष्पन्न झाल्यावर बीसीसीआयने स्पर्धा थांबवली.
आता या आजारातून पूर्णपणे सावरल्यानंतर संदीप वॉरियर याने महत्त्वपूर्ण खुलासा केला. आपल्या पत्नीने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे व्हिडिओ कॉल वरूनच ओळखले होते, असे वॉरियरने म्हटले.
वॉरियरने आपले म्हणणे मांडताना सांगितले, “माझा कोरोना अहवाल सकारात्मक येण्याआधीच माझ्या पत्नीने मी पॉझिटिव्ह असल्याचे सांगितलेले. ज्यावेळी माझी पहिली चाचणी निगेटिव्ह आली तेव्हा मी काहीसा निश्चिंत झालो होतो. मात्र, जेव्हा मी माझ्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला तेव्हा तिने माझा चेहरा पाहून मी पुढील चाचणीत पॉझिटिव्ह येणार आहे, असे सांगितलेले. ही गोष्ट मी तात्काळ संघ व्यवस्थापनाला सांगितली व बायो-बबलचा भाग नसलेल्या ठिकाणी गेलो. त्याचवेळी, वरूण चक्रवर्ती कोरोनाबाधित असल्याचे मला समजले.”
वॉरियरची पत्नी आरती ही डॉक्टर असून, ती काही महिन्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. संदीप वॉरियर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करतो. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला वॉरियर मागील दोन हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
योगा ते डम्बेल्स! भारतीय खेळाडू बायो बबल मध्ये ‘असा’ जपत आहेत फिटनेस
राहुल द्रविड ‘हा’ सल्ला नेहमीच द्यायचे, पृथ्वी शॉने दिला १९ वर्षांखालील संघातील जुन्या आठणींना उजाळा