क्रिकेटजगतात दर चार-पाच वर्षांनी एखादा मिस्ट्री बॉलर येतो. तो शक्यतो स्पिनरच असतो. त्याची मिस्ट्री उलगडायला वर्षभराचा तरी कालावधी नक्कीच जातो. श्रीलंकेचा अजंता मेंडींस अशीच मिस्ट्री घेऊन आला. त्याच्या मिस्ट्रीने टीम इंडियाच पानिपत झालं. मात्र, सचिन तेंडुलकरने लवकरच त्याची मिस्ट्री उघडी पाडली. वेस्ट इंडिजच्या सुनील नारायणने मात्र आपल्या मिस्ट्रीत आजतागायत सातत्य ठेवलंय. भारताच्या वरूण चक्रवर्तीने आयपीएलमध्ये हवा केली मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याची जादू चालली नाही. क्रिकेटच्या मैदानावरील बॉलर्सची ही मिस्ट्री म्हणजेच रहस्य बॅटर्सने उलगडले. मात्र, क्रिकेटविश्वातच अशा काही घटना घडल्या ज्याचे रहस्य कोणाला उलगडले नाही. या घटना अनेकदा भूतकाळाशी निगडित होत्या. भरपूर तपास केला गेला मात्र त्या घटनांचे गुढ आजही कायम आहे. आजच्या लेखामध्ये त्याच काही ‘क्रिकेट मिस्ट्री’ आपण जाणून घेऊयात.
क्रिकेटविश्वातील सर्वात वादग्रस्त आणि रहस्यमय घटना म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए याचा मृत्यू. 1999पर्यंत जगातील सर्वात उत्तम क्रिकेटर असलेला हॅन्सीने तीन वर्षात जग सोडलेले. मॅच फिक्सिंग प्रकरणातील तो सर्वात मोठा आरोपी होता. आपण बुकींकडून पैसे घेतल्याची आणि मॅच फिक्सिंग केल्याची कबुली त्याने दिली होती. लाईफ बॅन लावल्यानंतर तो नोकरी करत असताना 1 जून 2002 रोजी विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या या मृत्यूमागे घातपात असल्याची चर्चा होत असते. त्याने ज्या जॉर्ज विमानतळावरून उड्डाण केलेले त्या विमानतळाच्या ग्राउंड लँडिंग सिस्टममध्ये छेडछाड झाल्याची अफवाही पसरली होती. अनेकांनी म्हटलेले मॅच फिक्सिंग प्रकरणात अनेक मोठी नावे होती. त्यांची नावे खुली न व्हावी म्हणून त्याच्या प्रायव्हेट प्लेनचा अपघात घडवून आणला. परंतु, याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही.
क्रोनिएप्रमाणेच आणखी एका माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षकाचा असाच गुढ मृत्यू झाला. ते होते बॉब वूल्मर (Bob Woolmer). 2007 वनडे वर्ल्डकपवेळी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांचे आकस्मित निधन झाले. ते आपल्या हॉटेल रूममध्ये मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर बरेच वादंग उठले. सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या केली गेली असे म्हटले गेले. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध पराभूत झाल्याने वूल्मर व पाकिस्तानी खेळाडूंत वाद झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे हार्ट अटॅकने निधन झाल्याचे सांगितले. एक शक्यता अशीही वर्तवली गेली की, 1999 मॅच फिक्सिंग प्रकरणावेळी वूल्मर दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांना त्या प्रकरणातील काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत होत्या म्हणून त्यांचा खून केला गेला. त्यांच्या पत्नीनेही खुनाचा आरोप फेटाळला होता. परंतु, आजही त्या घटनेला क्रिकेटविश्वातील एक रहस्यमय घटनाच मानले जाते.
सन 1999 मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर 2013 इंडियन प्रीमियर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण बाहेर आले. यामध्ये श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला यांना दोषी समजून निलंबनाचे शिक्षा सुनावली गेली. देशभरातून अनेक सट्टेबाजांना अटक केली गेली. या सट्टेबाजांकडून अनेक मोठमोठे खुलासे झाले. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स हे दोन संघ दोन वर्षानंतर निलंबित झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लोढा समितीने केली. त्यांनी केलेल्या चौकशीच्याअंती एक अशी ही माहिती समोर आली की, आणखी 13 खेळाडूंचा या प्रकरणात समावेश होता. त्या खेळाडूंच्या नावाचा बंद लिफाफा कोर्टात सादर केला गेलेला. मात्र, तो लिफाफा केवळ सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींना वाचण्याची परवानगी दिली गेलेली. हे प्रकरण शेवटी मिटले मात्र त्या 13 जणांच्या नावाचा कधीही खुलासा झाला नाही.
सन 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी एक टेस्ट व दोन वनडे खेळलेला फास्ट बॉलर टर्टियस बॉश याचा मृत्यूदेखील संशयास्पद होता. वयाच्या केवळ 33व्या वर्षी तो निधन पावला. त्याचा मृत्यू गुईलीन बॅरो सिंड्रोममूळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतर असा देखील खुलासा झाला की त्याच्या शरीरात विषाचे अंश आढळले. तसेच त्याच्या पत्नीचे इतरत्र संबंध असल्याचे सांगून त्याच्या बहिणीने संपत्तीत हक्क मागितला होता. हे सर्व प्रकरण अनेक वर्ष न्यायालयात राहिले. मात्र, बॉशच्या मृत्यूबाबत काही स्पष्टता समोर आली नाही. त्याचा मुलगा कॉर्बिन बॉश हा नुकताच आयपीएलमध्ये दिसून आलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील दुर्मिळ योगायोग, भारतीयांनाही लावलाय नंबर; एका क्लिकवर घ्या जाणून
‘त्या’ वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिकेवर लागला चोकर्सचा शिक्का, खेळाडू स्वप्नातही विसरणार नाहीत