बांगलादेश क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज (६ जुलै) खेळला जात आहे. बांगलादेशचा ६ फूट ५ इंच उंचीच्या वेगवान गोलंदाजाने झिम्बाब्वेला सळो की पळो करून सोडले आहे. त्याने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध भेदक गोलंदाजी केली होती. तिच लय त्याने झिम्बाब्वेविरुद्ध कायम राखली.
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नाहिद राणाने आपल्या अचूक टप्प्यात गोलंदाजी करत झिम्बाब्वेची फलंदाजी फळी उद्ध्वस्त केली.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मेहेदि हसन मिराझचा हा निर्णय योग्य ठरल्याचे दिसले, कारण नाहिदने त्याच्या १० षटकांत केवळ २१ धावा दिल्या आणि सहा विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने दोन षटके निर्धाव टाकली.
केवळ राणाच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली नाही, तर बांगलादेश वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोत्तम गोलंदाजीची आकडेवारी ठरली आहे.
राणाने झिम्बाब्वेच्या वरच्या आणि मधल्या फळीला पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्याने झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधार सिकंदर रझा याला क्रीजवर अधिक काळ राहूच दिले नाही. तो १२ चेंडूंत एक धाव करत बाद झाला. याव्यतिरिक्त त्याने ५ आणखी विकेट्स घेत २० वर्ष जुना विक्रम मोडला.
बांगलादेशच्या वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी मशरफी मोर्तझाच्या नावावर होता. त्याने २००६ मध्ये केनियाविरुद्ध २६ धावा देत ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्याच्या ७ वर्षांनंतर रुबेल होसेनने न्यूझीलंडविरुद्ध ५.५ षटकांत २६ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या, मात्र मोर्तझाचा विक्रम मोडण्यात तो अपयशी ठरला.
वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशची सर्वोत्तम गोलंदाजी
नाहिद राणा – ६ /२१ विरुद्ध झिम्बाब्वे (२०२६)
मशरफी मोर्तझा – ६ /२६ विरुद्ध केनिया (२००६)
रुबेल होसेन – ६ /२६ विरुद्ध न्यूझीलंड (२०१३)
रिशाद हुसेन – ६ /३५ विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२५)
झिम्बाब्वेच्या भूमीवर परदेशी वेगवान गोलंदाजांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. राणाने १० षटकात २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या फिडेल एडवर्ड्सच्या नावावर होता. त्याने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २२ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. (Nahid Rana scripts history in Bangladesh odi cricket after taking 6 wickets vs Zimbabwe)
राणाच्या प्रभावी गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेचा डाव ३६.४ षटकांत १४१ धावसंख्येवर संपुष्टात आला.





