पुणे– नैशा रेवसकर हिने तेरा वर्षाखालील गटापाठोपाठ पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटातही विजेतेपद पटकाविले आणि फिनिक्स चषक टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. मुलांमध्ये मात्र कौस्तुभ गिरगावकर याने श्रेयस माणकेश्वर याला या संधीपासून वंचित ठेवले व पंधरा वर्षाखालील गटात विजेतेपदावर मोहोर उमटवली.
ही स्पर्धा जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने फिनिक्स फ्लायर स्पोर्ट्स अकादमीतर्फे मेट्रो सिटी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. मुलींच्या १५ वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत नैशा हिने चौथ्या मानांकित रुचिता दारवटकर हिच्यावर शानदार विजय मिळवला. शेवटपर्यंत रंगतदार झालेला हा सामना तिने ११-९,११-५, ६-११,६-११,११-७ असा जिंकला. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू कौशल्य दाखवले मात्र शेवटच्या गेममध्ये नैशा हिने खेळावर नियंत्रण ठेवले आणि अजिंक्यपद मिळविले. उपांत्य फेरीत तृतीय मानांकित नैशा हिने तनया अभ्यंकर हिचा ११-९,११-८,११-२ असा पराभव केला तर रुचिता हिने सई कुलकर्णी हिला ११-९,११-८,११-९ असे पराभूत केले.
तेरा वर्षाखालील गटात नैशा रेवसकर हिने अंतिम लढतीत अग्रमानांकित आद्या गवात्रे हिला पराभूत करीत सनसनाटी विजेतेपद पटकाविले. तृतीय मानांकित खेळाडू नैशा हिने हा सामना ९-११,११-२, ११-७, ११-८ असा जिंकला. पहिली गेम गमावल्यानंतर तिने सातत्यपूर्ण खेळाचा प्रत्यय घडविला आणि विजयश्री खेचून आणली. नैशा ही कामगार कल्याण केंद्र येथे नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. या मोसमातील तिचे हे तिसरे विजेतेपद आहे.
मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात अग्रमानांकित गिरगावकर याने सातव्या मानांकित श्रेयस याच्याविरुद्ध ११-५,११-८, ११-७ असा एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच टॉप स्पिन फटके आणि चॉप्स असा सुरेख खेळ केला. त्याने उपांत्य फेरीत स्वरूप भाडळकर याला ११-४, ११-६,११-७ असे पराभूत केले होते तर श्रेयस याने सहाव्या मानांकित आदित्य सामंत याच्याविरुद्ध १०-१२,११-८,८-११, १४-१२, ११-७ असा रोमहर्षक विजय नोंदविला होता.
तेरा वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयस याने अंतिम फेरीत अनंत कर्मपुरी या सातव्या मानांकित खेळाडूची आश्चर्यजनक विजयाची मालिका खंडित केली. हा सामना त्याने १२-१४,११-३,९-११,११-७,११-४ असा जिंकला.