इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात लोकप्रिय टी20 लीग आहे. मात्र या वर्षीच्या आयपीएलच्या 74 सामन्यांपैकी एकही सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला नाही. परंतु आता टी20 विश्वचषकाच्या तिसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हर पाहायला मिळाला आहे
टी20 विश्वचषकाचा तिसरा सामना नामिबिया आणि ओमान यांच्यात बार्बाडोसमध्ये खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना ओमाननं 109 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, नामिबियाचा संघही केवळ 109 धावाच करू शकला. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आला, ज्यामध्ये नामिबियानं विजय मिळवला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हर झाला आहे. शेवटच्या वेळी सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल 2012 मध्ये लागला होता.
सुपर ओव्हरमध्ये नामिबियाच्या संघानं प्रथम फलंदाजी केली. कर्णधार गेरहार्ड इरास्मस आणि डेव्हिड व्हिसा फलंदाजीला आले. ओमानकडून बिलाल खाननं गोलंदाजीची जबाबदारी घेतली. डेव्हिड व्हिसानं षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आणि चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. यानंतर कॅप्टन इरास्मसनं शेवटच्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. अशा प्रकारे षटकात एकूण 21 धावा झाल्या.
ओमानकडून झिशान मकसूद आणि नसीम खुशी फलंदाजीला आले. नामिबियाकडून डेव्हिड व्हिसानं गोलंदाजीची जबाबदारी घेतली. पहिल्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. पुढच्या चेंडूवर दोन धावा झाल्या. तिसऱ्या चेंडूवर खुशी बोल्ड झाला. पाचव्या चेंडूवर ओमानचा कर्णधार आकिब इलियास फलंदाजीला आला. या चेंडूवर त्यानं एक धाव घेतली आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. पण तोपर्यंत नामिबियानं सामना जिंकला होता. अशा प्रकारे डेव्हिड व्हिसा या सामन्यात नामिबियाच्या विजयाचा हिरो ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
चेंडू चुकून लागल्यानंतर गोलंदाजानं बाद केलं नाही, अशी खिलाडूवृत्ती क्रिकेटमध्येच दिसते! पाहा VIDEO
टीम इंडियाचा हेड कोच बनण्याच्या चर्चांवर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “हा सन्मान…”