---Advertisement---

नामिबियाचा आयर्लंडला पराभवाचा धक्का; ८ विकेट्सने विजय मिळवत सुपर १२ मध्ये दणक्यात प्रवेश

---Advertisement---

शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिली फेरी शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) संपली. या दिवशी अ गटातील आयर्लंड विरुद्ध नामिबिया यांच्या ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीतील सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात नामिबियाने आयर्लंडसारख्या तगड्या संघाला ८ विकेट्सने पराभवाचा धक्का देत सुपर १२ फेरीतील आपले स्थान पक्के केले.

पहिल्या फेरीतील अ गटात नामिबिया ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे ते सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आता त्यांचा समावेश सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटात झाला आहे. या गटात भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे. नामिबिया पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

नामिबियाचा शानदार विजय 
या सामन्यात आयर्लंडने नामिबियासमोर विजयासाठी २० षटकांत १२६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग नामिबियाने १८.३ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात १२६ धावा करत सहज पूर्ण केला. या सामन्यात नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मसने अर्धशतकी खेळी केली.

इरास्मसने ४९ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५३ धावा केल्या. त्याने १९ व्या षटकात चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात डेविड वीसने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

वीसनेही महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने १४ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २८ धावा केल्या. वीसने १५ व्या षटकात सलग २ षटकार मारत नामिबियाकडे सामना वळवला होता. त्याने इरास्मससह ५३ धावांची नाबाद भागीदारी रचली. त्याआधी नामिबियाचे सलामीवीर क्रेग विलियम्सने १५ धावांची आणि झेन ग्रिनने २४ धावांची खेळी केली.

आयर्लंडकडून कर्टिस कॅम्फरला विकेट घेण्यात यश आले. त्याने नामिबियाच्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १२५ धावाच करता आल्या. खरंतर आयर्लंडने सुरुवात चांगली केली होती. त्यांच्या पॉल स्टर्लिंग आणि केविन ओब्रायन या सलामी जोडीने ६२ धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचली होती. पण, स्टर्लिंगला ८ व्या षटकात बर्नार्ड शोल्ट्झने बाद केले. स्टर्लिंगने ३८ धावा केल्या.

त्याच्यानंतर केविन ओब्रायननेही ९ व्या षटकात २५ धावांवर विकेट गमावली. पण, यानंतर कर्णधार अँड्र्यू बलबिर्नीने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण तोही २१ धावांवर बाद झाला. यानंतर मात्र, आयर्लंडच्या फलंदाजीला उतरती कळा लागली आणि २० षटकांत संघाला १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्टर्लिंग, ओब्रायन आणि बलबिर्नी या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या आयर्लंडकडून पार करता आली नाही.

नामिबियाकडून जन फ्रायलिंकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, डेविड वीसने २ विकेट्स घेतल्या. याशिवाय जेजे स्मित आणि बर्नार्ड शोल्ट्झ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

डेविड वीसला त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या – 

उत्सुकता भारत-पाकिस्तान सामन्याची! तिकीटं ३३३ पट महाग, तर हॉटेलही झाले फुल

“हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही, तर मी त्याला माझ्या संघात ठेवणार नाही”

तो परत आला! पाकिस्तानच्या पराभवानंतर ‘ओ भाई मारो मुझे’ म्हणणारा चाहता पुन्हा चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---