मुंबई । जागतिक क्रिकेटमध्ये दोन दशकाहून अधिक काळ सचिन तेंडुलकरने आपला दबदबा निर्माण केला होता. आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक विक्रमांचे थर रचले. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा तो एकमेव खेळाडू आहे. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या सचिनने आपल्या कारकीर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पॉडकास्ट क्रिकेट इनसाइड आऊट या कार्यक्रमात इयन बिशप आणि एलमा स्मिट यांच्याशी बोलताना सचिन तेंडुलकर विषयी खुलासा केला आहे.
हुसेन म्हणाला की, “जगातल्या सर्व मैदानावर धावा करण्याचे तंत्र सचिन तेंडुलकरकडे होते. मला तो खेळाडू खूप आवडतो. जो सहज चेंडू खेळून काढायचा. त्याला बाद करण्यासाठी सामन्यापूर्वी आम्ही संघाच्या अनेक बैठका घ्यायचो. माझ्यामते सध्याच्या घडीला केन विलियमसन जवळ फलंदाजीचे चांगले तंत्र आहे. तो देखील चेंडू सहजरित्या खेळतो.”
“टी 20 क्रिकेटमुळे खेळाडू वर्तमान काळात खूपच आक्रमक खेळत आहेत. विल्यमसन क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळू शकतो. परिस्थिती अनुरूप आपल्या खेळात बदल करतो,” असे नासिर हुसेनने सांगितले.
यावेळी इयान बिशप म्हणाले की, “मी माझ्या कारकीर्दीत अनेक फलंदाजांना गोलंदाजी केली. त्यात सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करणे सर्वात अवघड होते. तो नेहमी ‘स्ट्रेट लाइन’मध्ये फटके मारायचा.”