जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. तरीही निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितवर विश्वास ठेवला. निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा करत रोहितकडेच कर्णधारपद ठेवले आहे. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. कसोटी संघात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला अनपेक्षितपणे संधी मिळाली. ही निवड आपल्यासाठी आश्चर्याचा धक्का असल्याचे त्याने म्हटले.
भारतीय कसोटी संघात या मालिकेसाठी चार वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे. मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकत यांच्यासह युवा मुकेश कुमार हा संघाचा भाग असेल. त्याचवेळी सैनी याला जवळपास अडीच वर्षानंतर भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे. ही बातमी ज्यावेळी आपल्याला समजली, त्याबाबत बोलताना तो म्हणाला,
“कसोटी संघात बोलावणे येईल याची अपेक्षाच नव्हती. आयपीएल दरम्यान मी इंग्लंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्युक चेंडूने सराव करत होतो. कारण जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी नेट बॉलर म्हणून संधी मिळेल अशी अपेक्षा होती. आजच मी काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचलो. लंडन विमानतळा बाहेर येताच मला भारतीय संघात निवडल्याची बातमी समजली.”
सैनी मागील वर्षीपासून वॉर्सेस्टरशायर काउंटी संघासाठी खेळत आहे. यावर्षी देखील तो या संघासाठी खेळताना दिसेल. त्याने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत केवळ दोनच कसोटी सामने खेळले आहेत. 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी व ब्रिस्बेन कसोटीत तो खेळला होता. दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा सैनी मागील दोन वर्षापासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसतो.
(Navdeep Saini Surprised After He Getting Call For West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या-
शमीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे संघातून का वगळलं? खरं कारण आलं समोर, लगेच वाचा
टीम इंडियात निवड झाल्यानंतर आली यशस्वीची प्रतिक्रिया, म्हणाला, “त्या तिघांकडून खूप शिकलो”