बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंट आणि त्याची 13 वर्षीय मुलगी गियाना यांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह या अपघातात एकूण 9 जणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. दिग्गज कोबी ब्रायंटच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रीडा जगताला धक्का बसला आहे.
कॅलिफॉर्नियामधील कॅलाबॅससजवळ स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजताच्या आसपास हा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा लॉस एंजलिस टाईम्सच्या वृत्तानुसार दाट धूके होते. यावेळी हेलिकॉप्टरला हवेत असतानाच आग लागली. त्यामुळे हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. त्यानंतर बचाव पथकालाही बचावकार्य करताना मोठा अडथळा येत होता. या दूर्दैवी अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
कोबी ब्रायंट नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये(एनबीए) खेळायचा. त्याचा एनबीएमध्ये 1996मध्ये प्रवेश झाला. तो एनबीएमध्ये लेकर्स संघाकडून खेळला. त्याने 20 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यानेे एनबीएमध्ये खेळताना 5 वेळा चॅम्पियनशिपही जिंकल्या होत्या.
त्याने 2016ला निवृत्ती घेतली होती. तसेच ऑलिंपिकमध्ये त्याने अमेरिकाकडून 2 सुवर्णपदकेही जिंकली होती. त्याने लेकर्सकडून खेळताना 8 आणि 24 क्रमांकाची जर्सी वापरली आहे. त्यामुळे लेकर्सने या दोन्ही क्रमांकाच्या जर्सी निवृत्त केल्या आहेत.