भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकलं. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात नीरजनं दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर भाला फेकला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकलं. त्यानं दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर भाला फेकून नवा ऑलिम्पिक विक्रम केला.
आता नीरज चोप्राबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. नीरज चोप्रा हर्नियाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी शस्त्रक्रिया करणार आहे. नीरजच्या कंबरेच्या भागात वेदना होत आहेत. तीन डॉक्टर नीरजवर शस्त्रक्रिया करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय नीरजलाच घ्यायचा आहे.
नीरज चोप्रानं स्वत: अंतिम सामन्यानंतर शस्त्रक्रियेचे संकेत दिले होते. चोप्रा फायनलनंतर म्हणाला की, “मी माझ्या टीमशी बोलेन आणि त्यानुसार निर्णय घेईन. माझ्या शरीराची सध्याची स्थिती अशी असूनही मी स्वत:ला पुढे ढकलत आहे. माझ्यात अजून खूप काही बाकी आहे आणि त्यासाठी मला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचंय.” नीरज मांडीच्या समस्येमुळे अलीकडच्या काळात फार कमी स्पर्धा खेळला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावं लागल्यानंतर नीरज चोप्राच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल होणार आहे. नीरजचे सध्याचे प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिट्झ हे आता त्याच्यासोबत राहणार नाहीत. क्लाऊस वर्षातून काही महिने नीरजसोबत काम करायचे. नीरज आणि त्याची टीम बॅकरूम स्टाफला अपग्रेड करण्याचा विचार करत आहे. क्लॉस 2018 पासून नीरजसोबत काम करत होते.
नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या ऑलिम्पिकमध्ये नीरजनं 87.58 मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं. पण नीरजला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या सुवर्णपदकाला डिफेंड करता आलं नाही. फायनलमध्ये नीरजचे 4 फाउल झाले. असं असलं तरी नीरजनं 89.45 मीटर भाला फेकला, जो त्याचा ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम थ्रो आहे. त्यानं पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेक करून अंतिम फेरी गाठली होती.
हेही वाचा –
भाला कशापासून बनतो? भालाफेकीचा इतिहास काय? रंजक माहिती जाणून घ्या
सिल्वर मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राला मोदींचा काॅल, दुखापतीबद्दल काय म्हणाले?
टोकियो ते पॅरिस… गोल्ड आणि सिल्वर! नीरज चोप्रा कसा बनला ऑलिम्पिकमधील भारताचा सर्वात मोठा ॲथलीट?