आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (२ मे) मुंबई इंडियन्सच्या नावावर एका विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. संघाने टी२० क्रिकेटमध्ये ५०,००० धावांचा टप्पा ओलांडण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान एमआयने हा टप्पा गाठला. हा टप्पा गाठण्यासाठी ११४ धावांची आवश्यकता असताना एमआयने आपल्या डावाच्या १५ व्या षटकात हा टप्पा पार केला.
विशेष म्हणजे हा विक्रम असा सामन्यात नोंदवला गेला, ज्यामध्ये एमआयने कमी धावसंख्या उभारली. आपल्या ३०८ व्या टी२० सामन्यात ही फ्रॅंचायजी ५०,००० धावांचा टप्पा ओलांडणारी पहिली फ्रॅंचायजी ठरली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये त्यांचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. एमआयच्या या एकूण धावसंख्येत २८६ आयपीएल सामने आणि २२ चॅम्पियन्स लीग टी२० सामन्यांमधील धावांचा समावेश आहे.
एमआय मागील काही वर्षांत त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे टी२० इतिहासातील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांपैकी एक बनले आहे. त्यांच्यासाठी सर्वाधिक धावा रोहित शर्माने केल्या आहेत. तो ६२८६ धावा करत संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला आहे. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव (३९३३०) आणि कायरन पोलार्ड (३९१५) यांचेही अधिक योगदान आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ
मुंबई इंडियन्स – ५०,००३ (३०८ सामने)
सोमरसेट काउंटी क्रिकेट क्लब – ४८,२४४ (३०३ सामने)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ४७,३०४ (२९५ सामने)
चेन्नई सुपर किंग्ज – ४६,४३८ (२८६ सामने)
भारतीय पुरुष क्रिकेट संघ – ४५,२४१ (२८१ सामने)
सीएसकेविरुद्धच्या सामन्यात एमआयने प्रथम फलंदाजी केली. ११ षटकापर्यंत संघाने १०० धावसंख्या पार केली. त्यामुळे ते २०० च्या आसपास यजमान संघाला लक्ष्य देईल असे वाटत होते, मात्र सीएसकेच्या गोलंदाजांनी वेळीच त्यांना रोखले. एमआयने नमन धीरच्या (५७) अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ७ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या.
प्रत्युत्तरात सीएसकेने चांगली सुरूवात केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाबाद ६७ धावा केल्या. त्याला कार्तिक शर्माने योग्य साथ दिली. कार्तिक ४० चेंडूत ५४ धावा करत नाबाद राहिला. हा सामना सीएसकेने ८ विकेट्सने जिंकला.




