विश्वचषक 2023 मध्ये मंगळवारी (17 ऑक्टोबर) मोठा उलटफेर झाला. विश्वचषकात खेळण्याचा जास्त अनुभव नसलेल्या नेदर्लंड्स संघाने अनुभवी दक्षिण आफ्रिका संघाला 38 धावांनी पराभूत केले. चोकर्स अशी ओळख असणारा दक्षिण आफ्रिका संघ या पराभवानंतर अधिकच चर्चेत आला. दुसरीकडे नेदर्लंड्स संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये नवे आव्हान घेऊन पुढे आला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला या सामन्यात विजयासाठी 43 षटकांमध्ये 246 धावांची आवश्यकता होती. मात्र, संघातील एकही फलंदाजाला मोठी खेळी करता न आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला नाही. क्विंडन डी कॉक (20) याच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका बसला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 10, 11 आणि 12 व्या षटकात पुढच्या तीन विकेट्स देखील संघाने गमावल्या. संघाला लागलेली ही गळती पुढे डेविड मिलर (David Miller) थांबवेल, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, मिलर देखील वैयक्तिक 43 धावांची खेळी करून त्रिफळाचीत झाला.
लोगन वॅन बिक याने नेदर्लंड्ससाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने टाकेलल्या 8.5 षटकांमध्ये 60 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. रोएलॉफ वॅन डर मर्व, पॉल वॅन मीकेरेन, बास डी लिडे यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. कॉलिन एकरमन यालाही एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून नेदर्लंड्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पावसामुळे हा सामना 43 षटकांचा खेळवला गेला. निर्धारीत षटकांमध्ये नेदर्लंडनसे 8 विकेट्सच्या नुकसानावर 245 धावा केल्या होत्या. यात कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने सर्वाधिक 78* धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेसाठी लुन्गी एनगिडी, मार्को यान्सेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच गेराल्ड कोएत्झे आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. शेवटच्या षटकांमध्ये नेदर्लंड्सच्या फलंदाजांनी आफ्रिकी गोलंदाजांची चांगलीच फोडून काढली होती. (Netherlands beat South Africa by 38 runs in World Cup 2023)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झे.
नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ वॅन डर मर्वी, लोगन वॅन बिक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.