ब्रिस्बेन। भारतीय संघाचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा मंगळवारी (१९ जानेवारी) संपला. या दौऱ्याचा शेवट भारतीय संघाने ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर विजय मिळवून गोड केला. गेल्या ३२ वर्षात या स्टेडियमवर अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची धूळ चारत भारताने इतिहास रचला. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला. विशेष म्हणजे या मालिकेदरम्यान अनेक प्रमुख खेळाडूंची दुखापतीमुळे एकएक करत गच्छंती झाली होती. शेवटच्या सामन्यात तर जवळपास १ आणि २ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेलेच खेळाडू संघात अधिक होते. अशा परिस्थितही युवा भारतीय संघाने अनुभवी आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला नमोहरन केले. यानंतर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मोठी आणि गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.
चॅनल ‘7क्रिकेट’ बरोबर बोलताना लँगर भारतीयांबद्दल म्हणाले, ‘पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवू की कोणत्याही गोष्टीला हलक्यात घ्यायचे नाही आणि दुसरी अशी की कधीही अगदी कधीही भारतीयांना कमी समजू नये. भारताची लोकसंख्या दीड अब्ज आहे आणि तुम्ही जर त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघात आहात तर तुम्ही नक्कीच एक चांगले आणि मजबूत खेळाडू असाल.’
या मालिकेत पहिल्या सामन्यात भारतीय संघ तीन दिवसातच पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने खेळाडूंना दुखापती होत असतानाही शानदार पुनरागमन करत मेलबर्न येथील दुसरा सामना जिंकला. त्यानंतर तिसरा सामना सिडनी येथे झाला. हा सामना भारताने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आणि अखेर ब्रिस्बेन येथे ऐतिहासिक विजय मिळवला.
या मालिकेबद्दल लँगर म्हणाले, ‘ही शानदार कसोटी मालिका होती. शेवटी एक संघ पराभूत होतो आणि एक संघ जिंकतो. आज कसोटी क्रिकेट जिंकले आहे. आम्हाला हा पराभव बऱ्याच काळासाठी त्रास देत राहिल. पण भारतीय संघाला या विजयाचे पूर्णपणे श्रेय जाते. आम्ही यातून बऱ्यात गोष्टी शिकलो.’
ते म्हणाले, ‘भारतीय संघाचे जेवढे कौतुक केले जावे, तेवढे कमी आहे. पहिल्या सामन्यात ३ दिवसात पराभूत झाल्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि शानदार पुनरागमन केले.’
याबरोबरच लँगर यांनी शुभमन गिल आणि रिषभ पंत यांचे कौतुक करताना म्हटले की ‘रिषभ पंतची शानदार खेळी होती. मला हेडिंग्लेमध्ये बेन स्टोक्सने केलेली खेळीची आठवण झाली. तो न घाबरता खेळला आणि ही अविश्वसनीय खेळी होती. शुभमन गिलनेही चांगली फलंदाजी केली.’
🗣 "Pant's innings reminded me a bit of Ben Stokes at Headingley actually.
🗣 "You can never take anything for granted. Never ever underestimate the Indians."
– Justin Langer talks to @haydostweets about the series #AUSvIND pic.twitter.com/lnbnjqWjmg
— 7Cricket (@7Cricket) January 19, 2021
ब्रिस्बेन कसोटी विजय –
ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या ३२ वर्षात कधीही ब्रिस्बेन येथील गॅबा स्टेडियमवर पराभूत झाला नव्हता. पण भारतीय संघाने अखेर गॅबाचा अवघड किल्लाही सर केला आणि ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांनंतर गॅबावर पराभूत करण्याची कामगिरी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी रिषभ पंत(८९*), शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पुर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
वंदे मातरम! ब्रिस्बेन कसोटी विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ फॅनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
“शब्दात भावना व्यक्तच होऊ शकत नाही” टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रहाणे खुष