मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स विरुद्ध खेळण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल होताच चाहत्यांनी त्याचं हूटिंग करत स्वागत केलं. यावेळी चाहते ‘रोहित-रोहित’च्या घोषणाही देताना दिसले. नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्यानं बोलायला सुरुवात केली तेव्हाही चाहत्यांनी त्याला बूइंग केलं.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यानं या घटनेवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतीय खेळाडूविरुद्ध भारतात अशी वेळ येण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं तो म्हणाला.
मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून ती हार्दिक पांड्याकडे सोपवली. मात्र व्यवस्थापनाच्या या निर्णयावर संघाचे चाहते खूश नाहीत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. आता गुजरात विरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला त्याच्या स्थानिक मैदानावरच चाहत्यांचा विरोध सहन करावा लागला.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान समालोचन करताना केविन पीटरसन म्हणाला, “भारतात अखेरच्या वेळी भारतीय क्रिकेटपटूचा अपमान कधी झाला होता? मी या आधी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला अशाप्रकारे अपमानित होताना पाहिलं नाही, ज्याप्रकारे अहमदाबादमध्ये चाहत्यांनी हार्दिक पांड्याचा अपमान केला. ही एक दुर्मिळ घटना आहे.”
पीटरसन पुढे म्हणाला, “तो कर्णधार आहे. जेव्हा जेव्हा तो क्षेत्ररक्षणासाठी किंवा चेंडू पकडण्यासाठी धावतो तेव्हा प्रेक्षक त्याच्याविरुद्ध जोरदार बूइंग करतात. मी भारतातील कोणत्याही खेळाडूसोबत असं घडताना पाहिलेलं नाही.”
जसप्रीत बुमराहसारखा वरिष्ठ वेगवान गोलंदाज असूनही हार्दिक पांड्यानं पहिलं षटक टाकल्याबद्दल पीटरसननं प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणाला, जसप्रीत बुमराहनं गोलंदाजीला सुरुवात का केली नाही हे मला समजलं नाही. हार्दिकच्या या निर्णयावर पीटरसनसोबत कॉमेंट्री करत असलेले माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरही चकित झालेले दिसले. “पीटरसनचा प्रश्न खूप चांगला आहे”, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकच्या चाहत्याला धुतलं! नरेंद्र मोदी स्टेडियममधील व्हिडिओ व्हायरल