आयपीएल २०२६ मध्ये अनेक युवा फलंदाज अनुभवी गोलंदाजांविरुद्ध सहजपणे मोठे आणि उत्तम शॉटस् खेळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू कृणाल पांड्या याने अशा आक्रमक फलंदाजीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेत आपले आव्हान कसे टिकून ठेवावे, याबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
कृणाल म्हणाला, “जर तुम्ही गेल्या दहा वर्षांपासून आयपीएलचे बारकाईने निरिक्षण केले, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही लीग आक्रमक फलंदाजीचे प्रतीक बनली आहे. तसेच फलंदाजांची मोठे फटके खेळण्याची क्षमताही बदलली आहे. नव्या पिढीचे फलंदाज सहजपणे चौकार-षटकार मारत आहेत.”
“एक गोलंदाज म्हणून गोलंदाजीत विविधता आणणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. तुम्हाला फलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहावे लागेल. तेव्हा बाउन्सर आणि यॉर्कर निर्णायक ठरतात”, असे कृणालने जियोस्टारला सांगितले आहे.
“हेनरिक क्लासेन आणि श्रेयस अय्यर यांच्यासारख्या महान फलंदाजांना गोलंदाजी करणे एक आव्हान असते, मात्र परिस्थिती ओळखून त्यानुसार जुळवून घेतले तर मदत होतो. मी परिस्थितीनुसार गोलंदाजी करतो. कधी आक्रमक गोलंदाजी करण्याची आवश्यकता असते, तर कधी धावा थांबवण्यासाठी योग्य चेंडू टाकण्याची आवश्यकता असते. कधी-कधी क्रिजवर एखादा धोकादायक फलंदाज असतो आणि तुम्हाला त्याच्या विकेटची गरज असते. त्याक्षणी तुम्हाला धोका घ्यावा लागतो, हे सर्व सामन्याच्या स्थितीवर अवलंबून असते,” असेही कृणालने पुढे म्हटले आहे.
राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हे आक्रमक फलंदाजीचे सध्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने आयपीएलच्या या १९ व्या हंगामात जागतिक दर्जाच्या अनेक गोलंदाजांविरुद्ध प्रभावी कामगिरी केली आहे.
आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीने ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते १२ गुणासंह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. आज (७ मे) त्यांचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आहे. हा सामना एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे.






