शनिवारी (२ ऑक्टोबर) शेख जायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्या डावात ऋतुराज गायकवाडने तुफानी शतक झळकावले. तर दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने जलद अर्धशतक ठोकले. त्यानंतर शेवटी शिवम दुबेने चौफेर फटकेबाजी करून राजस्थान रॉयल्स संघाला सामना जिंकून दिला. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे समर्थक गाणे गाऊन शिवम दुबेला चियर करताना दिसून येत आहेत.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने यूएईमध्ये खेळवले जात आहेत. तसेच चाहत्यांनाही हे सामने मैदानात येऊन पाहण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे चाहते देखील मैदानात येऊन सामन्यांचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. दरम्यान शिवम दुबे जेव्हा मैदानात चेन्नई सुपर किंग्स संघातील गोलंदाजांचा समाचार घेत होता, त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित राजस्थान रॉयल्स संघाचे समर्थक ‘हम किसी से कम नही’ चित्रपटातील गाणं गाऊन त्याचा उत्साह वाढवत होते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्टेडियममध्ये उपस्थित समर्थक, “बचना ए हसिनो, दूबे आ गया…” हे गाणं गाताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “आम्हाला दुबेसाठी आणखी एक नवीन मंत्र मिळाला आहे, तो असा आहे…” असे लिहिले आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय.
"We've got a new chant for Dube and it goes like…" 🎶 #RRvCSK | #IPL2021 | #HallaBol | @IamShivamDube pic.twitter.com/PbcGJ8Vbiq
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 2, 2021
चेन्नईने दिले १९० धावांचे आव्हान
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने ६० चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची खेळी केली.या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले होते. तर रवींद्र जडेजाने १५ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर ४ बाद १८९ धावा करण्यात यश आले होते.
राजस्थान रॉयल्स संघाचा विजय
चेन्नई सुपर किंग्स संघाने या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी १९० धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने तुफानी खेळी करत २१ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५० धावांची खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने येऊन ४२ चेंडुंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने नाबाद ६४ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
सॅमने टाकला ‘मून बॉल’, तर चेंडूला हवेत फटकावण्यासाठी फिलिप्स खूपच पळाला; पाहा मजेशीर व्हिडिओ
राजस्थान रॉयल्सविरुद्ध ऋतुची विशेष खेळी, सामन्यांनतर सांगितला धडाकेबाज शतकामागचा ‘राज’
हा चँपियन्स लोकांचा अंदाज!! मराठमोळ्या ऋतुराजने करुन दिली ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची आठवण