आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुरुष क्रिकेटसाठीच्या खेळ नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नियम बदल कसोटी सामन्यांमध्ये 17 जूनपासून, वनडे सामन्यांमध्ये 2 जुलैपासून आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 जुलैपासून लागू होतील.
सध्या वनडे सामन्यांमध्ये दोन नवीन चेंडू वापरले जातात. प्रत्येकी 25-25 षटकांसाठी दोन्ही टोकांवरून. मात्र, नवीन नियमानुसार आता दोन चेंडू फक्त 34 व्या षटकापर्यंतच वापरले जातील. 35व्या ते 50व्या षटकादरम्यान, संघाला आधीच्या दोन चेंडूंमधून एका चेंडूची निवड करून उर्वरित षटकांची गोलंदाजी पूर्ण करावी लागेल.
जर एखादा सामना सुरू होण्याआधी 25 षटकांपर्यंत मर्यादित केला गेला, तर फक्त एकच नवीन चेंडू वापरण्यात येईल.
या बदलांचा उद्देश फलंदाज व गोलंदाज यांच्यातील संतुलन पुन्हा प्रस्थापित करणे आहे. आयसीसीने स्पष्ट केले की, उच्च धावसंख्या नोंदवल्या जात असलेल्या वनडे सामन्यांमध्ये, विशेषतः शेवटच्या टप्प्यात गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग किंवा ग्रिप मिळवण्यात अडचण येत होती.
कन्कशन सब्सटीट्यूटमध्ये कडक नियम
अपघाती दुखापतीच्या (कन्कशन) प्रसंगी होणाऱ्या बदलाबाबतही सुधारणा करण्यात आली आहे. आता टॉसपूर्वी प्रत्येक संघाला पाच कन्कशन सब्सटीट्यूट्स – एक फलंदाज, एक विकेटकीपर, एक गोलंदाज, एक फिरकीपटू व एक अष्टपैलू – यांची यादी मैच रेफरीकडे द्यावी लागेल.
जर यापैकी एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला, तर मैच रेफरी ‘लाइक टू लाइक’ धोरणानुसार इतर पर्याय निवडू शकतो.
बन्नी हॉप नियमावर बंदी
एमसीसीने आणखी एक लहान पण महत्त्वाचा बदल केला आहे. आता बाउंडरी लाईनच्या बाहेर “बन्नी हॉप” करत घेतले जाणारे झेल अमान्य ठरवले आहेत. हा बदल निर्णय अधिक स्पष्ट आणि निष्पक्ष बनवण्यासाठी करण्यात आला आहे.






