आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यासाठी १० दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. सर्व खेळाडू आपापल्या संघाच्या बायो बबलमध्ये जमू लागले आहेत. त्याचवेळी, यावर्षी आयपीएलमध्ये काही नवीन नियमदेखील पाहायला मिळतील. सॉफ्ट सिग्नलचा नियम बदलल्यानंतर आता सर्व संघांसाठी ९० मिनिटांचा एक वेगळा नियम सुरू करण्यात येईल.
असा असेल नियम
बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींना एक ईमेल पाठविला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, आता २० षटके अवघ्या ९० मिनिटांत पूर्ण करावी लागतील. यापूर्वी, २० षटके ९०व्या मिनिटाला किंवा त्यापूर्वी सुरू होत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आता एक डाव किमान ९० मिनिटांत पूर्ण करावा लागणार आहे. खेळासाठी ८५ मिनिटे आणि ५ मिनिटांचा टाईम आउट असेल. याशिवाय सॉफ्ट सिग्नलचा नियम काढून त्याचे सर्व अधिकार तिसऱ्या पंचांना देण्यात आले आहेत. आता प्रत्येक षटकांसाठी ४ मिनिट आणि १५ सेकंद दिले आहेत. वेळ वाया घालवण्याचे मार्ग शोधत असलेल्या संघांना इशारा देण्याची मुभा पंचांना असेल. या नियमामुळे कर्णधारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
अशी होईल स्पर्धा
यावर्षीदेखील नेहमीप्रमाणे ८ संघ आयपीएलमध्ये सहभागी होतील. विशेष म्हणजे यावर्षी कोणत्याही संघाला आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळता येणार नाही. स्पर्धेतील सर्व सामने मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बेंगलोर व अहमदाबाद येथे पार पडतील. कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने सर्व स्पर्धा बंद दाराआड आणि विनाप्रेक्षक पार पडेल.
मुंबईला हॅट्रिकची संधी
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला यावर्षी सलग तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकण्याची संधी असेल. मुंबईने आत्तापर्यंत तब्बल ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. मागील वर्षीचे अपयश विसरून चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा मुसंडी मारण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रथमच आयपीएल जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
महत्वाच्या बातम्या:
ना धोनी ना रोहित ना कोहली; हे आहेत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
आठवतंय का? आजच्याच दिवशी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत टीम इंडियाने गाठली होती विश्वचषकची फायनल