आयपीएल 2020 चा हंगाम जिंकत मुंबई इंडियन्सने पाचवा किताब आपल्या नावावर करून घेतला. 2021 साली जर आणखी 2 संघ वाढले, तर ही स्पर्धा आणखीनच कठीण होणार आहे. अदानी ग्रुप हा अहमदाबाद संघासाठी इच्छुक आहे, तर संजीव गोएंका ग्रुप पुणे, लखनऊ किंवा कानपूर संघ विकत घेण्याची वाट पाहत आहे. बीसीसीआय अंतिम निर्णय घेईपर्यंत सर्वांनाच वाट पाहावी लागणार आहे. शिवाय निर्णय ठरला तर आयपीएलमध्ये 9 किंवा 10 संघ खेळताना दिसतील.
2011 च्या आयपीएल मध्येही होते 10 संघ
आयपीएलच्या चौथ्या हंगामात पहिल्यांदाच 10 संघ पहायला मिळाले होते. मात्र प्रत्येक संघाला 14 च सामने खेळायला मिळाले होते. काही संघांमध्ये फक्त एकच सामना पार पडला होता. पुणे वॉरियर्स इंडिया आणि कोची टस्कर्स केरला हे दोन नवे संघ सामील झाले होते. कोची संघाने ही एकमेव आयपीएल खेळत बाहेरचा रस्ता पकडला होता. यानंतर 2012 व 2013 मध्ये पुण्याचा संघ धरून एकूण 9 संघ खेळत होते. 2014 पासून पुन्हा स्पर्धा 8 संघांमध्ये झाली ज्यात पुण्याचा संघ बाहेर होता.
पुण्याचा संघ तिसऱ्यांदा दिसणार स्पर्धेत?
आयपीएल स्पर्धेत 2011,2012 व 2013 हे तीन वर्षे पुणे वॉरियर्स इंडिया संघ खेळला होता. सहारा ग्रूपचे सर्वेसर्वा सुब्राटा रॉय यांनी हा संघ पुण्यातील गहुंजे येथील स्वतःच्याच मैदान उतरवला होता. तिन्ही हंगामात हा संघ अपयशी ठरला. तसेच व्यवसाय क्षेत्रात समाधानकारक कामगिरी होत नसल्याने संघासह मैदानदेखील सहारा ग्रुपला सोडावे लागले.
आयपीएल 2016 पूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स 2 वर्षांसाठी निलंबित झाल्यानंतर गुजरात लायन्स समवेत रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या रूपात दुसऱ्यांदा पुण्याचा संघ मैदानात आला. मैदान तेच मात्र नाव बदलले होते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाला होम ग्राऊंडचा दर्जा मिळाला होता. या वेळी देखील पहिला हंगाम खराब ठरला, परंतु 2017 च्या दुसऱ्या हंगामात पुण्याने फायनलपर्यंत धडक दिली होती. अवघ्या एका धावेने पुण्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध चषक गमावला. 2016 व 2017 साठी पुण्याचा संघ संजीव गोएंका ग्रुपनेच घेतला होता. आणि आता याच शहराच्या नावासह ते पुन्हा उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अदानी ग्रुप अहमदाबाद संघासाठी आग्रही
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचे नुकतेच नुतनीकरण झाले आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे या मैदानाचे नाव आहे. हे स्टेडियम आता भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनले आहे. या मैदानात 1,10,000 लोक एकत्र बसून सामना पाहू शकतात. याच मैदानाला अहमदाबादचे होम ग्राउंड बनवीत नवीन संघ मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. हा संघ विकत घेण्यासाठी अदानी ग्रुप जास्त आग्रही असल्याचे दिसत आहे. अहमदाबाद संघ आयपीएलमध्ये आला, तर गुजरात राज्यासाठी हा दुसरा संघ असणार आहे. 2016-2017 मध्ये गुजरात लायन्स संघ स्पर्धेत होता.
उत्तरप्रदेशमधील लखनऊ- कानपूर देखील यादीमध्ये
आयपीएल 2021 मध्ये संघ वाढविले जाणार का? वाढविल्यास 1 किंवा 2 असे किती संघ वाढविणार हे देखील अद्याप निश्चित नसताना उत्तरप्रदेशमधील आयपीएल चाहतेदेखील पहिल्यांदाच त्यांच्या राज्यातील संघाला चिअर्स करण्याच्या प्रतीक्षेत आले आहेत. आयपीएलमध्ये नऊ संघ घोषित झाल्यास तो नववा संघ अहमदाबाद असण्याची शक्यता अधिक असून अदानी ग्रुप त्या संघासाठी जास्त आग्रही आहे.
जर दहा संघ निवडायचे झाल्यास संजय गोएंका ग्रुप पुणे, कानपुर किंवा लखनऊ पैकी एक संघ उचलू शकतो. महाराष्ट्र राज्याचा एक संघ मुंबई स्पर्धेत असताना जर पुण्याचा संघ बाजूला केला आणि उत्तरप्रदेश मधील एक संघ मैदानात आला तर युपी मधील प्रेक्षकांना त्यांचा घरचा संघ मिळणार आहे. यासाठी गोएंका ग्रुप लखनऊ किंवा कानपुर संघाची निवड करू शकतो.
कानपूरच्या तुलनेत लखनऊ संघाला जास्त महत्त्व दिले जाऊ शकते. त्याचे कारण असे की लखनऊ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. शिवाय याच शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम इकाना क्रिकेट स्टेडियम हे नवे मैदान उभे राहिले आहे. या मैदानाची संरचना देखील सुंदर असल्याने याच मैदानातून लखनऊ संघाला उतरवले जाऊ शकते. या मैदानात 2018 मध्ये भारताने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आयपीएल 2021 चे अंतिम निर्णय केव्हा?
आयपीएल 2021 साठी नवे संघ, नवी मैदान, मेगा लिलाव, आयपीएल सामने यासर्व गोष्टींवर बीसीसीआय विचार करीत असून दिवाळीनंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कधीही आपला निर्णय जाहीर करू शकते. या निर्णयानंतर डिसेंबरमध्येच लिलाव घेणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची झाली कोरोना टेस्ट; पाहा काय आलेत खेळाडूंचे रिपोर्ट
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर






