आज (24 जानेवारी) हॅग्ली ओव्हल, ख्राइस्टचर्च येथे भारत ‘अ’ विरुद्ध न्यूझीलंड ‘अ’ (India ‘A’ vs New Zealand ‘A’) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 29 धावांनी पराभूत केले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाने या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जॉर्ज वॉकरने (George Worker) शतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 बाद 295 धावा केल्या. यामध्ये न्यूझीलंडकडून खेळताना जॉर्ज वॉकरने 144 चेंडूत 135 धावा केल्या. यामध्ये 6 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर, कोल मॅकोंचीने (56) तर जेम्स नीशमने नाबाद (33) धावा केल्या. मात्र इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही.
भारताकडून गोलंदाजी करताना ईशान पोरलने (Ishan Porel) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 2 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल (Axar Patel) आणि कृणाल पंड्याने (Krunal Pandya) प्रत्येकी 1 विकेट घेतली.
न्यूझीलंडच्या 295 धावांचा पाठलाग करताना भारताला निर्धारित 50 षटकात 9 बाद 266 धावाच करता आल्या. भारताकडून फलंदाजी करताना कृणाल पंड्याने 48 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर, यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने (Ishan Kishan) नाबाद 44 धावांची खेळी केली. तसेच विजय शंकरने (Vijay Shankar) 41 तर कर्णधार मयंक अगरवालने 37 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना काईल जेमीसन (Kyle Jamieson), जेकॉब डफी (Jacob Duffy) आणि जेम्स नीशम (James Neesham) यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर ऑली न्यूटन (Ollie Newton) आणि रचिन रविंद्र (Rachin Ravindra) यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.