न्यूझीलंडने बुधवारी खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी20 सामन्यात भारतावर 50 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत जोरदार कमबॅक केला. मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील किवी संघाने भारताविरुद्ध सलग तीन सामने गमावल्यानंतर अखेर पहिला विजय नोंदवला. पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेत भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकत आधीच मालिका आपल्या नावावर केली असली, तरी हा पराभव भारतीय संघासाठी धक्का देणारा ठरला आहे.
या विजयामुळे न्यूझीलंडसाठी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. सप्टेंबर 2023 नंतर भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध मिळवलेला हा त्यांचा पहिलाच टी20 आंतरराष्ट्रीय विजय आहे. या काळात किवी संघाने सलग 13 सामने गमावले होते. त्यामुळे भारतावरील ही विजयाची चव न्यूझीलंडसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे.
डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 215 धावा केल्या. सलामीवीर टिम सायफर्टने 62 धावांची आक्रमक खेळी करत सामन्याचा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला. त्याला डेव्हॉन कॉनवेने 44 धावांची चांगली साथ दिली. भारताकडून अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
216 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. संपूर्ण 20 षटकेही न खेळता भारताचा संघ 18.4 षटकांत 165 धावांवर ऑलआऊट झाला. शिवम दुबेने 23 चेंडूत 65 धावांची झंझावाती खेळी करत एकाकी लढा दिला, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने गोलंदाजीत कमाल दाखवत 26 धावांत 3 विकेट घेतल्या, तर जेकब डफीने 2 फलंदाजांना माघारी पाठवले.
घरच्या मैदानावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पराभव ठरला आहे. सध्या मालिका 3-1 अशी भारताच्या बाजूने आहे. पाचवा आणि अंतिम सामना 31 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या विजयामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावला असून, भारत मात्र मालिका 4-1 ने जिंकत दमदार समाप्ती करण्याच्या प्रयत्नात असेल.






