नुकताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर पार पडला. १८ ते २३ जून दरम्यान हा सामना भारत आणि न्यूझीलंडच्या संघात खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने सफाईदार खेळ करत भारतीय संघाला ८ गडी राखून मात दिली आणि पहिल्यावाहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजेतेपदानंतर न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला आहे. मात्र त्यांना या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
काही खेळाडू इंग्लंडमध्येच
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडल्यावर न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला आहे. मात्र काही खेळाडू इंग्लंडमध्येच थांबले आहेत. यात केन विलियम्सनसह डेवॉन कॉन्वॉय, कायले जेमिसन, आणि कॉलिन डी ग्रँडहोम या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू इंग्लंडमध्ये जुलै महिन्यात खेळवल्या जाणार्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. यात विलियम्सन बर्मिंगहॅम संघाकडून, कॉन्वॉय सॉमरसेट संघाकडून, जेमिसन सरे संघाकडून तर ग्रँडहोम हॅम्पशायर संघाकडून सहभागी होतील. २१ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होईल.
उर्वरित खेळाडू मायदेशी परतले
या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंव्यतिरिक्त इतर अकरा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मायदेशी म्हणजे न्यूझीलंडला परतले. सिंगापूर मार्गे प्रवास करून ते ऑकलंडला पोहचले. यावेळी त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॅटलिंग कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा घेऊन विमानतळाबाहेर येतांना दिसला. न्यूझीलंड संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/CQjyPGdIMmZ/
अर्थात न्यूझीलंडचे खेळाडू मायदेशी परतले असले तरी त्यांना विजेतेपदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही जगभरात कायम असल्याने या खेळाडूंना मायदेशी परतल्यावर चौदा दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यावरच ते आपल्या कुटुंबियांसह आणि देशवासियांसह जल्लोष करू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या:
व्हिडिओ: भारतीय महिलांनी आपापसातच खेळली अनोखी स्पर्धा, पाहा कोण ठरलं विजयी
टी२० विश्वचषक आयोजनाबाबत बीसीसीआय सचिवांचे महत्त्वपूर्ण विधान, म्हणाले…






