भारतात खेळल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडनं आपला संघ जाहीर केला आहे. संघाचं नेतृत्व टीम साऊदीकडे आहे. तर केन विल्यमसन, टॉम लॅथम आणि एजाज पटेल सारखे अनुभवी खेळाडूही टीममध्ये आहेत.
न्यूझीलंडचा संघ पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमधील हा एकमेव कसोटी सामना 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान नोएडा येथे खेळला जाईल. यानंतर किवी संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. पहिला सामना 18 सप्टेंबरपासून तर दुसरा सामना 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
भारतीय उपखंडात होणाऱ्या सामन्यांकडे पाहता न्यूझीलंडनं फिरकी गोलंदाजांवर अधिक भर दिला आहे. संघात तीन डावखुरे आणि दोन उजव्या हाताच्या फिरकीपटूंची निवड करण्यात आली आहे. एजाज पटेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, मायकेल ब्रेसवेल आणि रचिन रवींद्र फिरकी गोलंदाजी करतील. याशिवाय केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे, टॉम लॅथम आणि डॅरिल मिशेलसारखे फलंदाज वरच्या फळीत खेळताना दिसणार आहेत. यष्टिरक्षणाच्या भूमिकेसाठी टॉम ब्लंडेलची निवड करण्यात आली असून विल यंग खालच्या क्रमात खेळताना दिसणार आहे.
श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेनंतर न्यूझीलंडला भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. किवी संघ ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत दौऱ्यावर येणार आहे. यानंतर ते घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. न्यूझीलंडचा संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून तीन मालिका खेळण्याची संधी आहे.
अफगाणिस्तान आणि श्रीलंका कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ पुढीलप्रमाणे – टीम साऊदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार), डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बे. सियर्स, केन विल्यमसन आणि विल यंग
हेही वाचा –
कॅरेबियन पॉवर! षटकार अन् तोही 113 मीटर लांब….चेंडू पुन्हा दिसलाच नाही
38 वर्षांनंतर प्रथमच भारतीय खेळाडू ठरले अयशस्वी! या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाही एकही शतक
“नाव विराट कोहली, रोल नंबर 18 आणि क्लास….” कोहलीच्या चाहत्यानं केली हद्दच पार