सोमवारी( 7 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत न्यूझीलंडने 3-0 असा विजय मिळवत श्रीलंकेला व्हाइटवॉश दिला आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरने शतकी खेळी करत न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
याबरोबरच त्याने वनडे क्रिकेटमध्ये सलग सहावेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रमही केला आहे. हा पराक्रम करताना त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
विराट आणि सचिन यांनी प्रत्येकी सलग पाच वनडे डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. विराटने 2012 मध्ये तर सचिनने 1994 मध्ये हा विक्रम केला होता.
टेलरने या सामन्यात 131 चेंडूत 137 धावा केल्या आहेत. तसेच त्याने या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. हे त्याचे 20 वे वनडे शतक आहे. तो न्यूझीलंडचा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाजही आहे.
त्याने मागील सहा वनडे डावात नाबाद 181, 80, नाबाद 86, 54, 90 आणि 137 अशा धावा केल्या आहेत. याबरोबरच टेलरने न्यूझीलंडकडून सलग सहा डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या अँड्र्यू जोन्स आणि केन विलियमसन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विलियमसनने हा पराक्रम 2015 ला आणि जोन्स यांनी 1988-89 मध्ये केला होता.
त्याचबरोबर वनडेमध्ये सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद यांच्या नावावर आहे. त्यांनी 1987 मध्ये सलग 9 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता.
तसेच मोहम्मद युसुफ, गोर्डन ग्रीनीज आणि मार्क वॉ यांनीही वनडेमध्ये सलग सहा डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
न्यूझीलंडने श्रीलंकेला तिसऱ्या वनडे सामन्यात 115 धावांनी पराभूत केले आहे. न्यूझीलंड कडून टेलर बरोबरच हेन्री निकोलसनेही नाबाद 124 धावांची खळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराटने जेव्हा ट्राॅफी हातात घेतली तेव्हा मी रडत होतो
–रहाणेसह टीम इंडियाचे हे खेळाडू परतले भारतात
–कसोटी मालिकेतील स्टार रिषभ पंतला वनडे संघातून या कारणामुळे वगळले