बर्मिंगहॅम। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात नुकतीच २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी (१३ जून) न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने ही मालिका १-० अशा फरकाने जिंकली आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. न्यूझीलंडचा सलमीवीर डेवॉन कॉनवेला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले आहे.
न्यूझीलंडचा इंग्लंडमधील तिसरा कसोटी मालिका विजय
न्यूझीलंडचा हा इंग्लंड विरुद्धचा इंग्लंडमधील एकूण तिसरा मालिका विजय आहे, तर या २१ व्या शतकातील पहिला मालिका विजय आहे. यापूर्वी न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच मायदेशात १८८६ आणि १९९९ साली कसोटी मालिकेत पराभूत केले होते.
असा झाला सामना
इंग्लंडने दुसऱ्या डावात न्यूझीलंड समोर केवळ ३८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने डेवॉन कॉनवे(३) आणि विल यंगची(८) विकेट लवकर गमावली. मात्र, टॉम लॅथमने नाबाद २३ धावा करुन न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून कॉनवेला ब्रॉडने आणि यंगला ऑली स्टोनने बाद केले.
त्याआधी इंग्लंडला दुसऱ्या डावात सर्वबाद १२२ धावाच करता आल्या होत्या. तसेच पहिल्या डावात ८५ धावांची पिछाडी स्विकारावी लागल्याने त्यांना न्यूझीलंडसमोर केवळ ३८ धावांचेच आव्हान उभे करण्यात यश आले. या डावात इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त ऑली पोपने २३ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. न्यूझीलंडकडून निल वॅगनर आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी ३ विकेट्स, तर ट्रेंट बोल्ट आणि एजाज पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडकडून रॉरी बर्न्सने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने डॉम सिब्लीसह ७२ धावांची सलामी भागीदारी रचली होती. तसेच त्याने ऑली पोप आणि डॅनिएल लॉरेन्ससह प्रत्येकी ४२ धावांची भागीदारी रचली. मात्र, तो ८१ धावांवर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर लॉरेन्सने फलंदाजीची जबाबदारी घेतली. त्याने देखील अर्धशतक पूर्ण करताना ८१ धावा केल्या. तसेच मार्क वूडने ४१ धावांचे योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३०३ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच मॅट हेन्रीने ३, एजाज पटेलने २ आणि निल वॅगनरने १ विकेट घेतली.
त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात डेवॉन कॉनवे, रॉस टेलर आणि विल यंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३८८ धावा केल्या आणि ८५ धावांची आघाडी मिळवली. कॉनवेने ८०, टेलरने ८० आणि यंगने ८२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर कॉनवे आणि यंग यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी झाली. तर टेलर आणि यंगमध्ये ९२ धावांची भागीदारी झाली.
या डावात इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वूड आणि ऑली स्टोनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर जेम्स अँडरसन आणि डॅनिएल लॉरेन्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.
कॉनवे मालिकावीर
या मालिकेत कॉनवेने कसोटी पदार्पण केले. पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच मालिकावीर ठरण्याचा मान त्याला मिळाला आहे. त्याने या मालिकेत खेळताना शानदार कामगिरी केली. त्याने लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात २०० धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने २३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ८० आणि दुसऱ्या डावात ३ धावा केल्या.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापूर्वी आत्मविश्वास
हा मालिकाविजय न्यूझीलंड संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कारण न्यूझीलंडला १८ ते २२ जून दरम्यान भारताविरुद्ध पहिल्या-वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डंका! इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने गाठले ‘हे’ स्थान
टी२० क्रिकेट मोठं झालं! १८ वर्षांपूर्वी ‘या’ दोन संघांत खेळला गेला होता पहिला टी२० सामना
ढाका प्रीमियर लीगच्या अधिकाऱ्यांवर हल्ला, पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या वादात अधिकारी जखमी