Pakistan vs New Zealand Tri-Series: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या आधी झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानसाठी, गोलंदाज आणि फलंदाजांनी सामन्यात खूपच खराब कामगिरी केली आणि त्यामुळे संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने एकूण 242 धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडने हे लक्ष्य सहज गाठले. केन विल्यमसन, डॅरिल मिशेल आणि टॉस लॅथम हे न्यूझीलंडसाठी सर्वात मोठे हिरो ठरले. या खेळाडूंनी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीने किवी संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात केन विल्यमसनने 49 चेंडूत 34 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि एक षटकार होता. चांगली सुरुवात असूनही, तो मोठी खेळी खेळू शकला नाही. परंतु कमी धावा करूनही त्याने मोठी कामगिरी केली. तो पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने इंझमाम उल हकला मागे टाकले आहे. यापूर्वी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंझमामच्या नावावर होता. विल्यमसनने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये 1290 धावा केल्या आहेत. तर इंझमामने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 1283 धावा केल्या होत्या.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 1290 धावा
इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) – 1283 धावा
सईद अन्वर (पाकिस्तान) – 1260 धावा
स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) – 1090 धावा
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – 1078 धावा
रॉस टेलर (न्यूझीलंड) – 1071 धावा
तिरंगी मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामने खेळले गेले, ज्यामध्ये दोन्ही वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला. यामध्ये अंतिम सामना देखील समाविष्ट आहे. आता 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घरच्या मैदानावर पाकिस्तानचा पराभव हा धक्कादायक आहे. तेही अशा वेळी जेव्हा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे.
हेही वाचा-
घरच्या मैदानावर पाकिस्तानची नामुष्की! तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत दारुण पराभव
WPL इतिहासात अभूतपूर्व विक्रम! चार फलंदाजांनी मिळून रचला अनोखा इतिहास
WPL 2025: रिचा घोषने मैदान गाजवलं, आरसीबीने गुजरातचा धुव्वा उडवत रचला इतिहास!