ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) शनिवारी (29 ऑक्टोबर) पहिला सामना अ गटातील न्यूझीलंड व श्रीलंका (NZvSL) यांच्या दरम्यान खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीला संकटात सापडलेल्या न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सच्या शतकाच्या जोरावर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. तसेच, त्यानंतर सर्वच गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा डाव केवळ 102 धावांवर संपवत न्यूझीलंडने 65 धावांनी आपला दुसरा विजय साजरा केला. या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.
A big win for New Zealand to keep their net run rate soaring 😍#T20WorldCup | #NZvSL | 📝: https://t.co/7YevVnQdfG pic.twitter.com/gnlGWMNVCx
— ICC (@ICC) October 29, 2022
अ गटात अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ताबडतोब सुरुवात देणारे डेवॉन कॉनवे व फिन ऍलन (Finn Allen) यांनी संघासाठी डावाची सुरुवात केली. मात्र, हे दोन्ही सलामीवीर तिसऱ्या षटकात 7 धावा धावफलकावर असताना तंबूत परतले. कर्णधार केन विलियम्सन हा देखील फारसे योगदान देऊ शकला नाही. त्यानंतर ग्लेन फिलिप्स व डॅरिल मिचेल ही जोडी जमली. त्यांनी 84 धावांची शानदार भागीदारी केली. मिचेलने 22 धावांचे योगदान दिले. फिलिप्सने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी 64 चेंडूवर 104 धावांची बहारदार खेळी केली. त्यामुळेच न्यूझीलंड संघ 20 षटकात 167 धावांपर्यंत पोहोचू शकला.
विजयासाठी मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अतिशय खराब झाली. टीम साऊदी व ट्रेंट बोल्टने 3.3 षटकात केवळ 8 धावांवर श्रीलंकेचे चार फलंदाज तंबूत पाठवले. 24 धावांपर्यंत श्रीलंकेचा अर्धा संघ बाद झालेला. यानंतर भानुका राजपक्षे याने काही मोठे फटके खेळत 22 चेंडूवर 34 धावा काढल्या. मात्र, इतर फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. कर्णधार दसून शनाकाने आक्रमक 35 धावा काढल्या. मात्र, सोढीने कुमाराला बाद करत श्रीलंकेचा डाव 102 धावांवर संपवला. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने सर्वाधिक चार बळी टिपले. फिलिप्सला त्याच्या शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता पाकिस्तानी चाहतेच उडवू लागले आपल्या संघाची खिल्ली; म्हणाले…
शतक एक विक्रम अनेक! फिलिप्सच्या सेंच्युरीने रचले दोन रेकॉर्ड, एकात बनलाय जगातील पहिला फलंदाज