जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने तसेच, आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना या आजाराची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आलेला. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे स्पर्धेतील उर्वरित सामने खेळविण्यात येतील. परंतु, या सामन्यांसाठी किती विदेशी खेळाडू उपलब्ध असतील याबाबत अजूनही स्पष्ट माहिती समोर येत नव्हती. त्याचवेळी आता, एका क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना या उर्वरित स्पर्धेसाठी उपलब्ध राहण्यास परवानगी दिली आहे.
या क्रिकेट बोर्डाने दिली परवानगी
आयपीएल २०२१ मधील आणखी ३१ सामने खेळणे बाकी आहेत. भारतातील परिस्थिती सध्या त्यासाठी योग्य नसल्याने हे सामने १९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत युएई येथील दुबई, शारजा व अबुधाबी येथे होतील. या सामन्यांसाठी कोणकोणते विदेशी क्रिकेटपटू उपलब्ध असतील याबाबत अजूनही स्पष्ट माहिती नाही.
त्याचवेळी, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिली आहे, असे एका फ्रॅंचाईजीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना या अधिकाऱ्याने म्हटले, “आयपीएलचे अजून महत्त्वाचे सामने खेळणे बाकी आहेत. या सामन्यांसाठी सर्व विदेशी खेळाडू उपलब्ध राहावेत अशी आमची इच्छा आहे. बीसीसीआय इतर बोर्डांशी याबाबत चर्चा करत असून, यावर सकारात्मक तोडगा निघेल. सध्यातरी केवळ न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना या उर्वरित हंगामात खेळण्याची परवानगी दिली आहे.”
पुढे येत असलेल्या बातम्यांनुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपले खेळाडू उर्वरित हंगामासाठी उपलब्ध नसतील असे कळवले आहे. तर, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून सध्यातरी याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. कॅरेबियन प्रीमियर लीगचा कार्यक्रम देखील बीसीसीआयच्या विनंतीवरून नव्याने आखला गेला आहे.
हे खेळाडू खेळतात आयपीएलमध्ये
आयपीएल २०२१ मध्ये सध्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा सनरायझर्स हैदराबादसाठी, जिमी निशाम व ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्ससाठी खेळतात. न्यूझीलंडचे सर्वाधिक तीन खेळाडू विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहेत. यामध्ये स्कॉट कुगलाईन, कायले जेमिसन व फिन ऍलन यांचा समावेश आहे. तर, टीम सायफर्ट व लॉकी फर्गुसन कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आपला खेळ दाखवतात. मिशेल सँटेनर चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडच्या संकेतस्थळाने सोडली पातळी, दाखवला विराटच्या गळ्यात पट्टा
“न्यूझीलंड क्रिकेटमधला हा सुवर्णक्षण, याचे सर्व श्रेय…”, किवी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
“कुलदीपच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला कर्णधार विराटसह वरिष्ठ खेळाडूंच्या सहकार्याची गरज”