न्यूझीलंड आणि अफगानिस्तान या दोन्ही संघामध्ये रविवारी (७ नोव्हेंबर) रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही देशांसह अगदी भारतातही या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. कारण या सामन्याच्या निकालावर भारत, न्यूझीलंड आणि अफगानिस्तान या तिन्ही संघांचे भवितव्य ठरणार आहे. यांपैकी कुठला संघ उपांत्य फेरीत जाईल, हे सामन्यानंतर कळेलच. परंतु या सामन्यापूर्वी आम्ही तुम्हाला न्यूझीलंड संघांच्या नॉकआऊट (बादफेरी) सामन्यांतील कामगिरीबद्दल अधिक माहिती देणार आहोत.
न्यूझीलंड संघांमध्ये एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत, परंतु त्यांना अजूनपर्यंत एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आली नाहीये. दोन वेळेस या संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाला ६ गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर २०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाने न्यूझीलंड संघाला ७ गडी राखून पराभूत केले होते.
नॉक आऊट सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाची कामगिरी
फक्त टी२० विश्वचषकात नव्हे तर, न्यूझीलंड संघाने २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध पार पडलेला हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड संघाने बाजी मारली होती.
टी-२० आणि वनडे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड संघाला अंतिम फेरी, उपांत्य फेरी आणि उपांत्यपूर्व फेरीत मिळून खेळलेल्या ४४ सामन्यांपैकी फक्त १३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ३० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
परंतु गेल्या काही वर्षात न्यूझीलंड संघाने नॉक आऊट सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी गेल्या ५ नॉकआऊट सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. यामध्ये २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचा देखील समावेश आहे. २०१९ मध्ये झालेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला पराभूत केले होते. तर २०१५ मध्ये झालेल्या उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामना टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास काय? घ्या जाणून गणिते
टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार भावूक; म्हणाला, ‘एका युगाचा अंत झाला’
VIDEO: ‘अंतिम सामन्या’त विकेट घेताच गेलला आनंदाने फुटले पंख, ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मारली मिठी