अबू धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर शनिवारी (६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा ८ गडी राखून पराभव झाला असला तरीदेखील हा सामना अनेक कारणांसाठी आठवण ठेवला जाणार आहे. या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीज संघाने २ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. परंतु आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या संघाने ५ सामने खेळले, ज्यामध्ये त्यांना फक्त १ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. हा सामना ख्रिस गेल आणि ड्वेन ब्रावो यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
सामना झाल्यानंतर कायरान पोलार्डने म्हटले की, “एकूणच ही एक निराशाजनक मोहीम ठरली. फलंदाजीच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे फ्लॉप ठरलो. आमची गोलंदाजी चांगली आहे पण फारशी चांगली नाही. हा एका पिढीचा अंत आहे, असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आमच्या संघासाठी आणि जगभरातील टी-२० क्रिकेटसाठी चांगली कामगिरी केली आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “एक संघ म्हणून आम्हाला खूप गर्व आहे. आम्हाला पाहावं लागेल की, आम्ही टी-२० क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो. आम्हाला एक गोष्ट जाणवली की, सुरुवातीच्या चार फलंदाजांनी जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करायला हवी. आम्हाला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागणार आहे. ज्याप्रकारे एविन लुईस फलंदाजी करत होता, ते पाहून आम्हाला वाटत होते की, आजचा दिवस कठीण जाणार आहे. परंतु ज्याप्रकारे डेविड वॉर्नरने फलंदाजी केली ते खरच अद्भुत होते. ज्यामुळे मार्शला फलंदाजी करण्यासाठी अधिक वेळ मिळाला. ”
ड्वेन ब्रावोचा ठरला अखेरचा सामना
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर ड्वेन ब्रावोची टी-२० कारकीर्द देखील समाप्त झाली आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, ख्रिस गेलचा देखील हा शेवटचा सामना होता. हा संघ आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये नवव्या स्थानी पोहोचला आहे. ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पात्रता फेरीतील सामने जिंकून प्रवेश करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘अंतिम सामन्या’त विकेट घेताच गेलला आनंदाने फुटले पंख, ऑस्ट्रेलियन फलंदाजाला मारली मिठी
वॉर्नरने बलाढ्य वेस्ट इंडिजला दिवसा दाखवले चांदणे, नाबाद ८९ धावा चोपत केला मोठा किर्तीमान
अफगाणिस्तानच्या खांद्यावर भारताचे ओझे; पण न्यूझीलंड जिंकल्यास काय? जडेजा म्हणाला, ‘बॅग भरून…’