सहसा क्रिकेट चाहत्यांची सर्वाधिक आवड आजही पुरुष क्रिकेटमध्ये असलेली दिसते. महिला क्रिकेटचा दर्जा हा दिवसेंदिवस सुधारत असला तरी, पुरुष क्रिकेट इतकी लोकप्रियता अजून त्याने गाठली नाही. असे असले तरी, महिला क्रिकेटमधील असे काही विक्रम आहे जे आजही अबाधित आहेत. ते विक्रम मोडण्याची कामगिरी आजतागायत पुरुष क्रिकेटपटू देखील करू शकले नाहीत. यापैकीच एक विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रम. हा विक्रम न्यूझीलंड महिला संघाच्या नावावर आहे.
आजच्या दिवशी रचला गेलेला विश्वविक्रम
एका आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रम बरोबर चार वर्षापूर्वी म्हणजे ८ जून २०१८ रोजी न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध केला होता. या कामगिरीनंतर या संघाचे नाव क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. मागील तीन वर्षात पुन्हा अशी कामगिरी महिला क्रिकेट संघ अथवा पुरुष क्रिकेट संघ यांच्याकडून झाली नाही.
न्यूझीलंडची विश्वविक्रमी धावसंख्या
आयर्लंड दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड महिला संघाने मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार सुझी बेट्स व जेस वॅटकिन्स यांनी १७२ धावांची धमाकेदार सलामी दिली. जेस ही १९ व्या षटकात ५९ चेंडूत ६२ धावा करून तंबूत परतली.
जेस बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या मॅडी ग्रीनने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. बेट्स व ग्रीन या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ११६ धावा जोडल्या. बेट्स ९४ चेंडूत १५१ धावांची तुफानी दिडशतकी खेळी करून तंबूत परतली.
कर्णधार माघारी गेली तरी, ग्रीन हिने आपल्या खेळात बदल केला नाही व आयर्लंडचे गोलंदाजांची पिसे काढत शतक साजरे केले. ४४ व्या षटकात बाद होण्यापूर्वी तिने ७७ चेंडूत १२१ धावांचा तडाखा दिला. युवा एमेलिया कर हीने केवळ ४५ चेंडूत नाबाद ८१ धावा कुटल्या. न्यूझीलंडने ५० षटकांच्या समाप्तीनंतर ४ बाद ४९१ अशी एव्हरेस्टसमान धावसंख्या उभारली. तेव्हापासून हा विश्वविक्रम कोणीही मोडू शकले नाही.
इंग्लंडच्या नावे पुरुष क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या
पुरुष क्रिकेटमधील सर्वाधिक वनडे धावसंख्येचा विश्वविक्रम इंग्लंड संघाच्या नावे आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ जून २०१८ रोजी ६ बाद ४८१ धावा झोडल्या होत्या. या सामन्यात इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो (१३९) व ऍलेक्स हेल्स यांनी शतके तर, जेसन रॉय आणि कर्णधार ओएन मॉर्गन यांनी अर्धशतके झळकावली होती.
महत्वाच्या बातम्या:
जेव्हा सेहवागने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा, २ चेंडूत २१ धावा चोपण्याचा केलता करिश्मा
जेव्हा भारतीय संघाच्या अकराच्या अकरा खेळाडूंनी केली होती गोलंदाजी, वाचा त्या सामन्याबद्दल
इंस्टाग्रामचा कोहलीच ‘किंग’! विराटने पूर्ण केले खास द्विशतक, बनला जगातील एकमेव क्रिकेटर





