संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरु असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात ब गटातील न्यूझीलंड आणि स्कॉटलंड हे संघ आमने-सामने आले. दुबई येथील दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने सलग दुसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. शानदार ९३ धावांची खेळी करणाऱ्या अनुभवी मार्टिन गप्टिलने या खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
गप्टीलची स्फोटक खेळी
पहिल्या दोन सामन्यात फॉर्मशी झगडत असलेल्या अनुभवी गप्टिलने या सामन्यात स्कॉटलंडच्या गोलंदाजांची चांगलीच पिसे काढली. त्याने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत चौकार-षटकारांची बरसात केली. १९ व्या षटकात झेलबाद होण्यापूर्वी त्याने ५६ चेंडूत ६ चौकार व ७ षटकार ठोकत ९३ धावा काढल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६६ इतका जबरदस्त राहिला. ही त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील १८ वी अर्धशतकी खेळी ठरली. त्याच्या नावावर दोन शतके देखील जमा आहेत.
गप्टिलचे नवे विक्रम
आपल्या ९३ धावांच्या खेळीमध्ये ७ षटकार ठोकत गप्टिल हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५० षटकार पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनला. २००९ पासून आजतागायत १०५ सामन्यांच्या १०१ डावात १५४ षटकार त्याच्या नावे जमा आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील भारताचा रोहित शर्मा त्याच्यापेक्षा २० षटकारांनी मागे आहे. आपल्या ९३ धावांच्या खेळीसह गप्टिलने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९० पेक्षा जास्त धावा काढण्याची कामगिरी पाचव्यांदा केली. रोहित शर्मा यानेदेखील अशी कामगिरी पाच वेळा केली आहे. या यादीमध्ये वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल चार ९० पेक्षा जास्त धावांच्या खेळ्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा करणार गोलंदाजी? सराव सत्रात दिसले निराळे दृश्य, पाहा व्हिडिओ
“शास्त्री आणि व्यवस्थापनाने दोन वर्षांत काहीच केले नाही”; भारतीय दिग्गज भडकला
नव्या टी२० क्रमवारीत बाबरची बादशाहत; हसरंगा गोलंदाजीत ‘नंबर वन’





