सध्या सगळीकडे 21 व्या फिफा विश्वचषकाची धूम आहे. त्यात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो की अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्यात त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे सर्वोत्तम कोण यासाठी नेहमीच तर्कवितर्क लढवले जातात.
पण अाता खुद्द मेस्सीचा चांगला मित्र असणाऱ्या ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारनेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
फिफा विश्वचषकातील ब्राझीलचा पहिला सामना रविवारी स्विझरलँड विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी डेसींपेडीडॉस या ब्राझिलियन यूट्यूब चॅनेलशी बोलताना नेमारने मेस्सी आणि रोनाल्डोपेक्षा तो जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने याचे कारणही सांगितले आहे.
नेमार म्हणाला, ” इतरांपेक्षा कोणी वरचढ असेल तर ते ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेस्सी आहेत.”
“विनम्रतेने, सध्या मी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. कारण ते दोघेही दुसऱ्या ग्रहाचे आहेत.” असे मजेदार उत्तर नेमारने रोनाल्डो आणि मेस्सी या दोन खेळाडूंबद्दल दिले आहे.
रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांनीही मागील काही वर्षांपासून फुटबॉलमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत प्रत्येकी 5 वेळा मानाचा बॅलन डी’ओर पुरस्कार पटकावला आहे.
सध्या रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाची रोनाल्डोने चांगली सुरवात केली आहे. शुक्रवारी पोर्तुगाल विरुद्ध स्पेन संघात झालेला सामना 3-3 असा बरोबरीचा झाला. असे असले तरी रोनाल्डोने पोर्तुगालसाठी तीनही गोल करून हॅट्रिक साजरी केली.
आता शनिवारी मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना आईसलँडविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मेस्सीच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषक ट्रॉफीची अनोखी कहानी….
–कालच्या सामन्यात हॅट्रिक केलेल्या रोनाल्डोला होऊ शकतो तुरुंगवास?