मुंबई । कोरोनाच्या सावटात बांगलादेशचे काही खेळाडू पुन्हा प्रशिक्षणासाठी सज्ज झाले आहेत. माजी कर्णधार मुस्तफिजुर रहीमसह बांगलादेशचे नऊ खेळाडू रविवारपासून चार ठिकाणी वैयक्तिक प्रशिक्षण पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) दिली.
बीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सराव सत्राच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण करून चार स्थाने तयार केली आहेत. निवेदनात म्हटले आहे की, अकॅडमीमध्ये धावण्या व्यतिरिक्त खेळाडू इनडोअर सेंटरमध्ये जिम आणि फलंदाजी करतील. अन्य तीन ठिकाणी फक्त धावण्याच्या आणि जिमच्या सुविधा उपलब्ध आहेत.
मुशफिकूर, इमरुल कायस, मोहम्मद मिथुन, शफीउल इस्लाम ढाका येथे तर सय्यद खालिद अहमद आणि नसुम अहमद सिलहटमध्ये सराव करणार आहेत. मेहदी हसन आणि नुरुल हसन खुलाना येथे सराव करतील तर नईम हसन चितगाव येथे सराव करतील. गेल्या महिन्यात बांगलादेशचा माजी एकदिवसीय कर्णधार मशराफी मुर्तझा, माजी खेळाडू नजमुल इस्लाम आणि नफीस इक्बाल कोविड 19 च्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले होते.
इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तानपाठोपाठ सराव सत्राला सुरुवात करणारा बांगलादेश ६वा संघ ठरणार आहे.