अँटिग्वा। वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका संघात सध्या २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम, अँटिग्वा येथे सुरु आहे. या सामन्यादरम्यान एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना निरोशान डिकवेल्लाच्या जर्सीमागे असलेल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल पाहायला मिळाला.
डिकवेल्लाच्या जर्सीमागे नेहमी ‘Dickwella’ असे स्पेलिंग लिहिलेले असते. मात्र श्रीलंकेच्या दुसऱ्या डावादरम्यान जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा त्याच्या जर्सीमागे ‘Dicwella’ असे लिहिलेले होते. म्हणजेच त्याच्या नावाच्या स्पेलिंगमधील ‘K’ हे अक्षर गायब होते.
कारण मात्र गुलदस्त्यात
डिकवेल्ला त्याच्या नावाच्या स्पेलिंगमधील ‘K’ अक्षर गायब असलेली जर्सी का घालून आला होता, याबद्दल कोणतीही माहिती त्याने दिलेली नाही. त्यामुळे नक्की यामागे काय कारण असावे याचा अंदाज लागलेला नाही.
दुसऱ्यांदा हुकले शतक
डिकवेल्लाने श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. त्याने १६३ चेंडूत ८ चौकारांसह ९६ धावा केल्या. मात्र तो डावाच्या १४७ व्या षटकात केमार रोचने त्रिफळाचीत केले. त्यामुळे डिकवेल्लाची पहिले कसोटी शतक करण्याची संधी मात्र हुकली. डिकवेल्लाची कसोटीमध्ये नव्वदीत बाद होण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी तो इंग्लंडविरुद्ध जानेवारी महिन्यात झालेल्या कसोटी सामन्यात ९२ धावांवर बाद झाला होता.
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्याची स्थिती
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला असून चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या डावात २० षटके १ बाद ३४ धावांवर खेळत आहे. त्यांना अजून ३४१ धावांची गरज आहे.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद १६९ धावा करता आल्या होत्या. त्यांच्याकडून पहिल्या डावात लहिरु थिरिमन्नेने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली होती. तसेच वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात सर्वबाद २७१ धावा केल्या आणि १०२ धावांची आघाडी घेतली. त्यांच्याकडून राहकिम कॉर्नवॉलने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर जोशुओ डी सिल्वा (४६), काईल मेयर्स (४५) आणि जॉन कॅम्पबेल(४२) यांनी फलंदाजी करताना चाळीशीचा टप्पा ओलांडला. श्रीलंकेकडून सुरंगा लकमलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात मात्र कमाल केली. श्रीलंकेकडून पाथम निशंकाने १०३ धावांची शतकी खेळी केली. तर डिकवेल्ला (९६) आणि ओशाडा फर्नांडो (९१) हे दोघे नव्वदीत बाद झाले. तसेच लहिरु थिरिमन्ने(७६) आणि धनंजय डी सिल्वा (५०) यांनी अर्धशतके केली. त्यामुळे श्रीलंकेला दुसऱ्या डावात सर्वबाद ४७६ धावांचा टप्पा गाठता आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावातील १०२ धावांच्या पिछाडीनंतरही वेस्ट इंडिजला ३७५ धावांचे आव्हान दिले. या डावात वेस्ट इंडिजकडून राहकिम कॉर्नवॉल आणि केमार रोचने सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सोडून आता मुंबईला रवाना होणार धोनी आणि कंपनी, ‘हे’ आहे कारण
मुंबई इंडियन्सचा आश्चर्यकारक निर्णय, केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूची संघात केली निवड