ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात नितीश कुमार रेड्डीनं शतक झळकावलं. आता त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे. नितीशसाठी इथपर्यंत पोहोचणं अजिबात सोपं नव्हतं. नितीशला क्रिकेट खेळण्यासाठी त्याच्या वडिलांनी नोकरी सोडून मोठा त्याग केला होता. चला तर मग, या बातमीद्वारे अंडर-14 पासून मेलबर्नपर्यंतचा नितीशचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.
नितीश रेड्डीचे वडील मुत्याला रेड्डी हे हिंदुस्थान झिंक कंपनीत नोकरी करायचे. त्यांनी आपल्या मुलामध्ये क्रिकेटची आवड लहानपणापासूनच ओळखली होती. 2003 मध्ये विशाखापट्टणममध्ये जन्मलेला नितीश लहानपणापासूनच स्टेडियममध्ये जायचा. नितीश 12-13 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची राजस्थानच्या उदयपूरला बदली झाली. यानंतर वडिलांच्या लक्षात आले की याचा परिणाम नितीशच्या करिअरवर होऊ शकतो. यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, तरीही मुत्याला रेड्डी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
अंडर-14 स्पर्धेतून ओळख मिळाली – टीम इंडियाचे माजी खेळाडू एमएसके प्रसाद यांनी नितीश रेड्डी याची प्रतिभा ओळखली. एमएसके प्रसादनं अंडर-12 आणि अंडर-14 च्या स्थानिक सामन्यांदरम्यान नितीशला टिपलं होतं. यानंतर नितीशला वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आंध्र प्रदेशकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. 2020 मध्ये नितीशनं आंध्र प्रदेशसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केलं.
प्रथम श्रेणी पदार्पण करण्यापूर्वी नितीशनं 2017-18 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये धमाल कामगिरी केली होती. त्यानं या मालिकेत 176.41 च्या सरासरीनं 1237 धावा केल्या होत्या. या काळात त्यानं एक त्रिशतक, दोन अर्धशतकं आणि दोन शतकं झळकावली. याशिवाय नागालँडविरुद्धच्या सामन्यात नितीशनं 366 चेंडूत 441 धावांची खेळी केली होती.
आयपीएलनं ओळख दिली – देशांतर्गत क्रिकेटमध्ये खळबळ माजवणाऱ्या नितीश रेड्डीला आयपीएलनं खरी ओळख दिली. 2023 मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादनं 20 लाख रुपयांना विकत घेतलं. मात्र, त्यावर्षी त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्यानंतर 2024 मध्ये नितीशनं आयपीएलमध्ये मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला. त्यानं हैदराबादसाठी 11 डावात फलंदाजी करताना 303 धावा केल्या आणि 7 डावात 3 बळी घेतले.
यानंतर नितीशनं ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीद्वारे कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानं पहिल्याच सामन्यात 41 आणि 38* धावांची खेळी खेळून आपली संघात निवड का झाली हे दाखवून दिलं.
हेही वाचा –
MCG मध्ये नितीश रेड्डीचा फिल्मी अवतार, ‘पुष्पा’ नंतर ‘बाहुबली’ सेलिब्रेशन; पाहा VIDEO
अर्धशतकास पुष्पा तर शतकास बाहुबली! शतकानंतर नितीश रेड्डीचे हटके सेलिब्रेशन, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
नितीश रेड्डीचं शतक, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी; मेलबर्नमध्ये तिसरा दिवस भारताच्या नावे