भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून यजमानांविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघममध्ये पार पडला. या सामन्यात अखेरच्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने एकाही चेंडूचा खेळ झाला नाही, त्यामुळे सामना अनिर्णित सुटला. असे असले तरी या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चांगल्या लयीत दिसला. त्याच्या शानदार प्रदर्शनाबद्दल भारतीय क्रिकेट चाहतेही आनंद व्यक्त करत आहेत.
नॉटिंघम कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळानंतर बुमराहने म्हटले होते की, त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कोणतीही विशेष तयारी केली नाही. मात्र, बुमराहने कबूल केले की, न्यूझीलंडविरुद्धच्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीत निराशाजनक कामगिरीनंतर त्याने आपली मानसिकता बदलली होती.
खरंतर भारताला या इंग्लंड दौऱ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता. या सामन्यात बुमराहला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यामुळे त्याचे गोलंदाजीतील अपयश भारताला महागात पडल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. मात्र बुमराहने या अपयशानंतर इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम येथे झालेल्या कसोटीत ९ विकेट्स घेत शानदार पुनरागमन केले.
याबद्दल नॉटिंघम कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या अखेरीस बुमराह म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर जास्त बदल करण्याची गरज नव्हती, फक्त मानसिकतेत बदल करावा लागला. परिणामाबद्दल विचार करण्याची गरज नव्हती, फक्त माझ्या कौशल्यांवर विश्वास दाखवून माझ्या खेळाचा आनंद घेतला.”
बुमराह म्हणाला की, “मी केलेला कोणताही बदल नाही किंवा बदल करण्याचा विचार करत नाही. मी फक्त माझा खेळ सुधारण्यासाठी आणि नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहे.” भारताला नॉटिंघम कसोटीच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी १५७ धावांची गरज होती. मात्र, पावसाचा अडथळा आला.
भारताला होती विजयाची संधी
बुमराह आणि अन्य भारतीय वेगवान गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे नॉटिंघम कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडला १८३ धावांवर बाद करण्यात भारतीय संघाला यश आले. त्यानंतर भारताने पहिल्या डावात केएल राहुलच्या ८४ आणि रवींद्र जडेजाच्या ५६ धावांच्या मदतीने २७८ धावा केल्या आणि ९५ धावांची आघाडी घेतली.
यानंतर कर्णधार जो रूटच्या १०९ धावांमुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात ३०३ धावा करता आल्या. त्यामुळे भारताला २०९ धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने १ बाद ५२ धावा केल्या होत्या आणि लक्ष्यापासून १५७ धावा दूर होता. पण पाचव्या दिवशी खेळच झाला नसल्याने सामना अनिर्णित ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘फॅब फोर’मध्ये असला तरी स्मिथला चार गोलंदाजांचे येते टेंशन, ‘या’ भारतीयाचाही त्यात समावेश
जुलै २०२१ ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही
गेल्या २ वर्षांत भारतासाठी इंग्लंडमधील पाऊस ठरतोय त्रासदायक; गमावलेत ‘हे’ २ महत्त्वाचे सामने