क्रिकेट जगतात भारतीय संघ आपल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. भारताने क्रिकेट जगताला एकाहून एक बहाद्दर फिरकी गोलंदाज दिले आहेत. भारताची भूमी ही फिरकीपटूंची जन्मभूमी मानली जाते. मात्र सध्या भारतीय संघाकडे दर्जेदार फिरकीपटू नाहीत, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने मांडले आहे. तसेच अलीकडे भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरोधात धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत, असेही सेहवाग म्हणाला आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात या महिन्यात 19 तारखेपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सेहवागने हे वक्तव्य केले आहे. आपल्या या वक्तव्यासह त्याने कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन यांसारख्या अनुभवी फिरकीपटूंच्या प्रतिभेवर बोट ठेवले आहे.
अलीकडेच श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचे खेळाडू फिरकीपटूंसमोर मोठ्या धावा काढण्यासाठी झडपडताना दिसत होते. त्याचा परिणाम असा झाला की, श्रीलंकेने वनडे मालिका आपल्या नावावर केली. याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सेहवाग म्हणाला, “एक कारण म्हणजे सध्या पांढऱ्या चेंडूने जास्त क्रिकेट खेळले जात आहे. टी20 क्रिकेटमध्ये तुम्ही 24 चेंडू टाकता, पण फिरकीपटू म्हणून तुम्ही चेंडूला उंची देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही फलंदाजाला बाद करण्यासाठी आवश्यक असे कौशल्य विकसित करू शकत नाहीत.”
पुढे सेहवाग म्हणाला, “भारतीय खेळाडू कमी देशांतर्गत क्रिकेट खेळतात. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा जास्त फिरकी गोलंदाजी खेळायला मिळते. हे देखील एक कारण असू शकते. मला वाटतं, सध्या हा खेळ खेळू शकणारे चांगले फिरकीपटू भारतात नाहीत. जो चेंडूला वेळेत उंची देऊ शकतो आणि विकेट घेऊ शकतो.”
तसे पाहिल्यास, भारताकडे सध्या कुलदीप यादव आहे जो आपल्या फिरकीने कहर करत आहे. रविचंद्रन अश्विन हा भारताचा कसोटीतील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. सेहवागच्या विधानाने या दोन्ही गोष्टींचे खंडन केले आहे.
‘आम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळायचो’
सेहवाग म्हणाला की तो जेव्हा खेळायचा तेव्हा देशांतर्गत क्रिकेटला चुकत नसे. तो म्हणाला, “आमच्या काळात राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, युवराज सिंग, आम्ही सर्वजण देशांतर्गत क्रिकेट खेळायचो. वनडे क्रिकेट असो किंवा चार दिवसीय सामने. आम्ही खूप देशांतर्गत क्रिकेट खेळायचो. त्या सामन्यांमध्ये आम्ही अनेक फिरकीपटूंविरोधात खेळायचो पण आजच्या व्यस्त वेळापत्रकात खेळाडूंना कमी वेळ मिळत आहे.”
हेही वाचा –
उंच उडीत प्रवीणची सुवर्ण कामगिरी! भारतानं जिंकलं सहावं गोल्ड मेडल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटसोबत कट झाला होता? राजकारणात प्रवेश केल्यानंतर दिलं सूचक उत्तर
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?