टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आणि त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात न्यूझीलंडला ८ विकेट्स राखून पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या या विजयासोबतच एक अनोखा योगायोग समोर आला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही तो संघ विजयी झालेला नाही, जो नॉकआउट सामन्याच्या आधी भारतीय संघासोबत भिडला असेल.
ऑस्ट्रेलिया यावर्षी टी-२० विश्वचषकाच्या ग्रुप एकचा भाग होता आणि न्यूझीलंड संघ ग्रुप दोनमध्ये सामील होता. न्यूझीलंड ग्रुप दोनमध्ये सहभागी असल्यामुळे त्याला भारतीय संघासोबत सुपर १२ फेरीतील एक सामना खेळावा लागला होता. आणि ऑस्ट्रेलिया ग्रुप एकमध्ये असल्यामुळे त्यांना भारतासोबत एकही सामना खेळण्याची वेळ आली नव्हती.
आता याच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर एक अनोखा योगायोग समोर आला आहे. २००६ पासून २०१६ पर्यंत एकूण सहा टी-२० विश्वचषक खेळले गेले आहेत आणि यापैकी पहिल्या टी-२० विश्वचषकात भारताने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००९ ते २०१६ दरम्यान ज्या ज्या संघांनी टी-२० विश्वचषक जिंकला आहे, त्यांनी नॉकआउट सामन्याच्या आधी एकदाही भारताचा सामना केलेला नाही.
याचाच अर्थ असा होतो की, टी-२० विश्वचषकात आतापर्यंत जे संघ उपांत्य किंवा अंतिम सामन्याच्या आधी भारतासोबत भिडले, त्यांना स्पर्धेचे जेतेपद जिंकला आलेले नव्हते. आता यावर्षीही ऑस्ट्रेलियाने जेतेपद जिंकल्यानंतर हा विक्रम कायम राहिला आहे.
दरम्यान, टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला नाणेफेक जिंकली होती आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य १८.५ षटकात आणि २ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सनने सर्वाधिक ८५ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त मार्टिन गप्टिलनेही संघाच्या धावसंख्येत २८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी सुरुवातीला सलामीवीर डेविड वार्नरने (५३) अर्धशतक केले आणि बाद झाला. मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ७७ धावांची नाबाद खेळी केली आणि सामनावीर ठरला. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनसाठी १५ नोव्हेंबरचा दिवस आहे ‘मास्टर ब्लास्टर’; क्रिकेटमधील पदार्पण, निवृत्तीशी आहे खास कनेक्शन
चँपियन कपल! ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवत स्टार्क, ॲलीसा जोडप्याच्या नावे जबर विक्रमाची नोंद